तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूर शहरात एका रिक्षाचालकाने आदिवासी महिलेवर बलात्कार व तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामुळे जातीय तणाव निर्माण झाला असून प्रशासनाला संचारबंदी लागू करावी लागली आहे. अफवा आणि खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जैनूर शहरात कलम १६३ बीएनएसएस अंतर्गत जमावबंदी आदेश जारी करण्यात आले असून या भागात इंटरनेट बंद करण्यात आले आहेत.
परिस्थिती नियंत्रणात आली असून, अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रॅपिड अॅक्शन फोर्सलाही पाचारण करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. जैनूर शहरात एका आदिवासी महिलेवर दुसऱ्या समाजातील व्यक्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला होता.
संतप्त झालेल्या काही तरुणांनी दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना जाळल्या आणि एका धार्मिक स्थळावर दगडफेकही केली. यामुळे दोन समाजात संघर्षात झाले. आंदोलकांनी दुसऱ्या समाजाच्या मालमत्तेवर हल्ले करण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी जाळपोळ, दगडफेक आणि मालमत्तेचे नुकसान केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
३१ ऑगस्ट रोजी जैनूर मंडळात एका ४५ वर्षीय आदिवासी महिलेवर रिक्षाचालकाने बलात्काराचा प्रयत्न केला होता, मात्र तिने आरडाओरडा केल्यावर चालकाने काठीने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ही महिला रस्त्यावर बेशुद्ध पडली. पोलिसांनी महिलेला जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शुद्धीवर आल्यानंतर महिलेने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि लैंगिक छळ, खुनाचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर आदिवासी संघटनांनी बंदची हाक दिली. पोलिसांनी समाजातील ज्येष्ठांशी बोलून परिस्थिती शांत केली. पोलिस कर्मचारी शहरात गस्त घालत आहेत. विशेष पथके तयार करण्यात आली असून जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटनांचा तपास केला जात आहे.
आरोपीला यापूर्वीच अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याने दोन्ही समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आसिफाबाद जिल्ह्यातील कुमुराम भीममधील जैनूर गावात एका आदिवासी महिलेवर उपद्रवी लोकांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यामुळे मला खूप दु:ख झाले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांशी बोलून मदतीची तयारी दर्शवली.
कुमार म्हणाले की, त्यांनी तेलंगणाच्या डीजीपींशी संपर्क साधला आहे आणि दोषी आणि हल्ल्यास जबाबदार असलेल्यांवर त्वरित आणि निःपक्षपाती कारवाई करण्याची मागणी केली आहे. जैनूरमधील कायदा व सुव्यवस्था तात्काळ व प्रभावीपणे पूर्ववत करण्याची सूचना केली. महिलांची सुरक्षा आणि समाजातील शांतता सर्वोपरि आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी तेलंगणाच्या पोलिस महासंचालकांशी (डीजीपी) असिफाबाद जिल्ह्यातील जैनूर येथे झालेल्या जातीय अशांततेच्या घटनांबद्दल बोललो आहे. तेलंगणाच्या डीजीपींनी मला आश्वासन दिले आहे की यावर लक्ष ठेवले जात आहे आणि अतिरिक्त दल पाठवले जात आहे आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.