मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  india's warren buffett: राकेश झुनझुनवाला यांच्या ४६ हजार कोटींच्या साम्राज्याची धुरा कोण वाहणार?

india's warren buffett: राकेश झुनझुनवाला यांच्या ४६ हजार कोटींच्या साम्राज्याची धुरा कोण वाहणार?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 16, 2022 02:52 PM IST

Rakesh Jhunjhunwala Estate: भारताचे वॉरेन बफे अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्या ४६ हजार कोटींच्या साम्राज्याची धुरा कोण वाहणार असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.

Rakesh Jhunjhunwala
Rakesh Jhunjhunwala

Rakesh Jhunjhunwala Estate: भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक गुरू अर्थात, ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांच्या अकाली निधनामुळं अनेकांना धक्का बसला आहे. शेअर बाजारातील खाचाखोचा जाणून घेऊन त्या माध्यमातून अफाट नफा मिळवणारे झुनझुनवाला हे तब्बल ४६ हजार कोटींची संपत्ती मागे सोडून गेले आहेत. आता त्यांच्यानंतर गुंतवणुकीसह त्यांच्या अन्य उद्योग व्यवसायांच्या भवितव्याची चर्चा सुरू झाली आहे.

राकेश झुनझुनवाला हे केवळ मोठे गुंतवणूकदारच नव्हते, तर उद्योजकही होते. अॅप्टेक लिमिटेड, हंगामा डिजिटल मीडिया एन्टरटेन्मेंट प्राइव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते. याशिवाय, बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोवोग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोवासिंथ टेक्नोलॉजीस (आई) लिमिटेड, प्राइम फोकस लिमिटेड, जियोजित फायनान्शियल सर्विसेस, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, व्हाइसरॉय हॉटेल लिमिटेड आणि टॉप्स सिक्युरिटी लिमिटेड या कंपन्यांच्या संचालक मंडळातही त्यांचा समावेश होता. अकासा एअरलाइन्समध्ये राकेश झुनझुनवाला व त्यांच्या पत्नीची मिळून तब्बल ४० टक्के भागीदारी आहे. स्टार हेल्थ अलाइड इन्शुरन्समध्ये ते प्रवर्तक आहेत. जूनच्या तिमाहीअखेर स्टार हेल्थमध्ये त्यांची भागीदारी १७.४६ टक्के इतकी होती.

झुनझुनवाला यांच्या मागे पत्नी रेखा, मुलगी निष्ठा आणि आर्यमान व आर्यवीर असे दोन मुलगे आहेत. त्यांची पत्नी रेखा ही आपल्या मुलांसोबत आता त्यांचा सर्व व्यवसाय सांभाळणार असल्याचं समजतं.

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकासाठी राकेश झुनझुनवाला यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. १९८५ साली अवघ्या ५ हजार रुपयांनिशी त्यांची शेअर बाजारात गुंतवणुकीला सुरुवात केली. त्यावेळी बीएसईचा निर्देशांक १५० वर होता. २००३ मध्ये त्यांनी पत्नीच्या सल्ल्यानुसार 'रेअर एन्टरप्राइजेस' या स्वत:च्या शेअर ट्रेडिंग फर्मची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सध्याची त्यांची संपत्ती अंदाजे ४६ हजार कोटी असून त्यातील तब्बल २९,७०० कोटी लिस्टेड कंपन्यांतील गुंतवणुकीतून आले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग