
राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असून देशभरातील रिक्त झालेल्या ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या ५६ जागांपैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत. त्यातील तीन जागा या भाजप खासदारांच्या असून त्यासाठी भाजपने महाराष्ट्रातून आठ जणांची नावं निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यसभेच्या १५ राज्यातील ५६ जागा रिक्त होत आहेत. त्यात महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. २७ फेब्रुवारीला राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेसचा एक, राष्ट्रवादीचा एक आणि भाजपचे तीन आणि ठाकरे गटाचे एक अशा सहा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे.
भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही व्ही मुरलीधरन हे तीन खासदार निवृत्त होणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर आणि राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचा समावेश आहे.
कार्यकाळ संपणाऱ्या तीन खासदारांपैकी भाजपकडून केवळ नारायण राणे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तीन जागांसाठी भाजपने आठ नावांची निश्चिती केली आहे. या आठ नावांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर, अमरिश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, संजय उपाध्याय आणि नारायण राणे यांचा समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर होणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. १६ फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया होईल. तसंच, २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घऊ शकतील. तर, २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर, २७ तारखेलाच मतमोजणी होईल.
संबंधित बातम्या
