मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gehlot vs Pilot : हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जाणार; सचिन पायलट आता काय करणार?

Gehlot vs Pilot : हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जाणार; सचिन पायलट आता काय करणार?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 29, 2022 03:51 PM IST

Congress President Election 2022 : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली पक्षांतर्गत धुसफूस अखेर आज संपली. कारण आता या निवडणुकीत अशोक गेहलोतांनी माघार घेतली असून दिग्विजय सिंह यांचं नाव जवळपास फायनल झालं आहे.

Gehlot vs Pilot On Congress President Election 2022
Gehlot vs Pilot On Congress President Election 2022 (HT)

Ashok Gehlot vs Sachin Pilot On Congress President Election 2022 : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा तिढा अखेर संपला आहे. कारण आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळं आता जी२३ गटाचे उमेदवार शशी थरुर आणि दिग्विजय सिंह यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. परंतु आता यातून राजस्थानच्या राजकीय सत्तासंघर्षाची लढाई अजून संपलेली नाही, असंच चित्र आहे.

राजस्थानातील सत्तानाट्याची सुरुवात कुठून झाली?

कॉंग्रेस नेते आनंद शर्मा आणि गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षातील जी२३ गटानं कॉंग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, अशी मागणी केली. त्यानंतर सोनिया गांधींना पक्षाला लागलेली गळती विचारात घेता अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली. त्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय अशोक गेहलोत यांना उमेदवारी देण्याचंही निश्चित करण्यात आलं होतं. परंतु ही बातमी जशी जयपूरला आली तेव्हापासून राजस्थान कॉंग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या.

कॉंग्रेसमधील असंतुष्ट युवा नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत फिल्डिंग लावायला सुरुवात केली. तर दुसरीकडे सीपी जोशी आणि धारिवाल यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी अशोक गेहलोत हे राजस्थानमध्ये रहावेत, यासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी करायला सुरुवात केली. परंतु चित्र हाताबाहेर जात असल्याचं पाहून गेहलोत गटाच्या ९२ आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवत कॉंग्रेसच्या शीर्ष नेत्यांवर दबाव निर्माण केला, त्यात गेहलोतांच्या समर्थक मंत्र्यांना यश आलं आहे.

आता गेहलोतांचं काय होणार?

२०१८ साली राजस्थानमध्ये असंच राजकीय संकट उभं राहिलं होतं. त्यावेळी कॉंग्रेसनं अशोक गेहलोतांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवलं. परंतु आता पक्षश्रेष्ठींची इच्छा असतानाही अशोक गेहलोतांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यामुळं आगामी काळात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणेच गेहलोतांचीही उचलबांगडी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सचिन पायलट काय भूमिका घेणार?

गेल्या तीन वर्षांपासून सचिन पायलट हे राजस्थानमध्ये मंत्रिमंडळात नाहीत. त्यांच्याकडे पक्षाचं कोणतंही पद नाही. त्यामुळं २०१९ च्या राजकीय तिढ्यानंतर त्यांनी समंजस्याची भूमिका घेतलेली होती. भाजपनंही हीच सुवर्णसंधी साधत त्यांना भाजपप्रवेशाची ऑफरही दिली होती. परंतु सध्याच्या राजकीय गोंधळात सर्वाधिक आमदार गेहलोतांच्या पाठिशी असल्याचं दिसून आलं. याशिवाय केवळ १५ ते १७ आमदारांनी पायलट मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी सोनिया गांधींकडे केल्याचं समजतं. त्यामुळं आता सचिन पायलटांना आगामी निवडणुकीपर्यंत 'थांबा आणि वाट पाहा' शिवाय कोणताही पर्याय असल्याचं दिसत नाही. तर दुसरीकडे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसूंधरा राजे सिंधिया आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातील राजकीय द्वंद सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळं जर त्यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला तर ते कॉंग्रेसच्या गडाचा पाडाव करण्यात यशस्वी ठरू शकतात.

पंजाबप्रमाणेच राजस्थानही कॉंग्रेसच्या हातातून जाणार?

ज्या पद्धतीनं राजस्थानमध्ये सत्तानाट्य झालं त्याचप्रमाणे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंजाब कॉंग्रेसमधील धुसफूस समोर आली होती. त्यामुळं पक्षाला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं आता सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील राजकीय वितुष्टामुळं कॉंग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा कमी परंतु तोटा जास्त होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point