Rajasthan Accident News: राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात आज (१४ एप्रिल २०२४) भीषण अपघात घडला. फतेहपूर येथील आशीर्वाद चौकाजवळील भरधाव कार आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. या भीषण घडकेनंतर वाहनांनी पेट घेतला. या आगीत सहा जण होरपळल्याची माहिती समोर येत आहे. पारी अडीच वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. हा अपघात सीकर जिल्ह्यातील फतेहपूरमधील शेखावती येथे झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर कारने पेट घेतला. मात्र, कारमधील लोकांना बाहेर पडता आले नाही. या भीषण अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. या अपघातानंतर पुलावर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी अथक परिश्रम करून तेथील वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक माहितीच्या आधारे हा ट्रक नागौरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारने ट्रकला धडक दिल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि काही क्षणातच कार पेटू लागली. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक हादरले. मात्र, लोकांना काही समजण्यापूर्वीच मोठा अपघात झाला. आगीत होरपळलेल्या लोकांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. कारची नंबर प्लेट उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
हरियाणा राज्यातील महेंद्रगडमध्ये काही दिवसांपूर्वी जवळपास ४० शाळेकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. या अपघातात सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ मुले जखमी झाली आहेत. हा अपघात महेंद्रगड जिल्ह्यातील कनीना परिसरात कनीना-दादरी मार्गावर झाला. बस चालक दारूच्या नशेत होता, असा आरोप स्थानिक लोकांकडून करण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी बस चालकाने मद्यपान केले होते की नाही, याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान स्कूल बसचे फिटनेस प्रमाणपत्र २०१८ मध्येच संपले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.