आयुष्याच्या शेवटच्या वळणावर पती-पत्नीची साथ खूप मोलाची असते. असाच विचार करून राजस्थानमधील एका सरकारी अधिकाऱ्याने आजारी पत्नीच्या देखभालीसाठी नोकरीतून लवकर निवृत्ती घेतली, जेणेकरून ते आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे तिच्यासोबत घालवू शकतील. पण आयुष्यात काही वेगळंच लिहिलं होतं. त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांनी नोकरीतून निवृत्ती घेतली. त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑफिसमध्ये त्यांच्यासाठी एक भव्य फेअरवेल पार्टीही आयोजित केली होती. ज्यात त्यांची पत्नीही सहभागी झाली होती. पण सर्व काही आनंददायी झालं नाही. पार्टीत झालेल्या दुर्दैवी अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आणि त्या अधिकाऱ्याच्या आयुष्यातील आनंद उध्वस्त झाला.
ही घटना कोटा येथील डकानिया मधील आहे. देवेंद्र संदल हे येथील मध्यवर्ती गोदामात व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. निवृत्तीच्या तीन वर्षांआधीच त्यांनी सेवेतून व्हीआरएस घेतला होता. त्यामुळेच ऑफिसमध्ये शेवटच्या दिवशी त्याच्यासाठी रिटायरमेंट पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याची पत्नीही त्याच्यासोबत जाणार होती. सकाळी देवेंद्र पत्नी दीपिकासोबत कार्यालयात पोहोचले. दीपिका नेहमी आजारी असायच्या, पण पार्टीत ती खूप खुश दिसत होती.
आता दोघं एकत्र वेळ घालवतील आणि देवेंद्र आपल्या आजारी बायकोची चांगली काळजी घेऊ शकतील, याचा लोकांना आनंद होता, पण अचानक पार्टीतच दीपिकाची तब्येत बिघडली आणि त्या खुर्चीवरून खाली कोसळल्या. या घटनेनं सगळीकडे गोंधळाचे वातावरण झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सात महिन्यांपूर्वी कोटा येथे आलेल्या देवेंद्र यांना अपत्य नव्हते. देवेंद्र ऑफिसला जायचे आणि दीपिका घरात एकट्याच रहायच्या. त्यांना हृदयरोग होता. त्यामुळे देवेंद्र यांना सतत पत्नीची चिंता सतावत होती. या चिंतेसाठी आणि काळजीसाठी त्यांनी लवकर निवृत्ती घेतली, पण सर्व योजना कोलमडल्या व देवेंद्र यांना एकटेपणा आला.
संबंधित बातम्या