मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सरकारी नोकरीसाठी जन्मदाता बनला यमदूत, पाच महिन्याच्या चिमुकलीची नाल्यात फेकून हत्या

सरकारी नोकरीसाठी जन्मदाता बनला यमदूत, पाच महिन्याच्या चिमुकलीची नाल्यात फेकून हत्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 24, 2023 04:37 PM IST

तिसरे अपत्य झाल्याने सरकारी नोकरी जाईल या भीतीपोटी एका व्यक्तीने पत्नीच्या साथीने आपल्या पाच महिन्याच्या चिमुकलीला नाल्यात फेकून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

राजस्थानच्या बीकानेरमध्ये एका चिमुरडीच्या हत्येची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेत सहायक पदावर कार्यरत व्यक्ती व त्याच्या पत्नीने सरकारी नोकरीच्या लालसेपोटी आपल्याच ५ महिन्याच्या चिमुरडीची नाल्यात फेकून हत्या केली आहे. पोलिसांनी आपल्याच मुलीच्या हत्येच्या आरोपात दाम्पत्याला अटक केली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, आरोपी झवरलाल मेघवाल (३६) आणि त्याची पत्नी गीता देवी (३३) यांनी कायमस्वरुपी नोकरी मिळवण्यासाठी धक्कादायक पाऊल उचलले. पोलिसांनी सांगितले की, या दाम्पत्याला आधीपासूनच तीन मुले होती. त्यांनी आपली एक मुलगी नातेवाईकाला दत्तक दिली होती.नाल्यात फेकलेली ५ महिन्याची मुलगी सर्वात छोटी होती. 

बीकानेरचे पोलीस अधीक्षक (एसपी) योगेश यादव यांनी सांगितले की, दाम्पत्याला आपल्याच मुलीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपीने पत्नीच्या साथीने नोकरी वाचवण्यासाठी आपल्याच मुलीची हत्या केली. छतरगड पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३०२ आणि १०२ बी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

स्कूल सहायक पदावर कार्यरत आहे आरोपी -

छत्तरगड ठाणेप्रभारी जयकुमार यांनी सांगितले की, आरोपी झवरलाल मेघवाल सध्या चांडासर पंचायतअंतर्गत स्कूल सहायक पदावर कार्यरत आहे. त्याने आपल्या प्रतिज्ञापत्रात दोन मुले असल्याचे लिहिले होते. तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्याला भीती होती की, राज्य सरकारच्या दोन मुलांच्या धोरणानुसार त्याला नोकरीत कायम केले जाणार नाही. धोरणानुसार तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर कर्मचाऱ्याला अनिवार्य सेवानिवृती सामील आहे. 

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने यासाठी आपल्या पत्नीला समजावले होते. दोघांनी रविवारी आपल्या पाच महिन्याच्या मुलीला मारण्यासाठी तिला इंदिरा गांधी नाल्यात फेकले व गपचुप घरी परत आले.

IPL_Entry_Point