rajasthan gang rape : राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अंगणवाडी सेविकेची नोकरी देण्याच्या बहाण्याने १५ ते २० महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आठ एफआयआर दाखल केल्या आहेत. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि आयुक्तांनी त्यांच्या आठ ते दहाहून अधिक साथीदारांसोबत हे कृत्य केले असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी त्यांचे अश्लील व्हिडिओही बनवले असल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितांनी आरोप केला आहे की, अंगणवाडी केंद्रात नोकरी देण्याच्या आमिषाने त्यांना सिरोही येथे बोलावण्यात येऊन हे कृत करण्यात आले.
एकीकडे सभापती आणि आयुक्तांनी आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी माहिती घेण्यासाठी सिरोहीचे पोलीस अधीक्षक ज्येष्ठा मैत्रेयी यांना फोन केला असता, त्यांनी उचलला नाही. मात्र, एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात ८ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आयपीसीच्या कलम ३७६डी, ४१७ आणि ३८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषद सिरोहीचे अध्यक्ष महेंद्र मेवाडा, माजी आयुक्त महेंद्र चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सभापती आणि आयुक्तांनी हे प्रकरण खोटे ठरवून त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सर्व एफआयआरमध्ये सारखेच आरोप करण्यात आले आहेत. सुमारे दोन-तीन महिन्यांपूर्वी पीडित महिला या अंगणवाडी केंद्रांमध्ये नोकरीच्या शोधात आल्या होत्या. त्या पैकी १५ -२० हून अधिक महिलांना सिरोहीला बोलावण्यात आल्याचा आरोप तक्रार दार महिलांनी केला. नगरपरिषदेचे सभापती महेंद्र मेवाडा व महेंद्र चौधरी यांनी त्यांची भेट घेतली व ओळखीच्या व्यक्तीच्या घरी त्यांची राहण्याची व्यवस्थाही केली.
यावेळी जेवणातून अमली पदार्थ दिल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. जेवणानंतर सर्व महिला बेशुद्ध झाल्या होत्या. पीडित महिलांचा दावा आहे की जेव्हा महिला शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांना डोकेदुखीचा त्रास झाला. महेंद्र मेवाडा, महेंद्र चौधरी आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर या दरम्यान, बलात्कार केल्याचा आणि अश्लील व्हिडिओ तात्यार केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही पीडितांनी केला आहे.
रक्कम न दिल्यास त्यांचे व्हिडिओ सार्वजनिक करू, अशी धमकी आरोपींनी दिल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. महेंद्र मेवाडा यांनी महिलांना नोकऱ्या देण्याच्या नावाखाली कोऱ्या कागदांवर आणि स्टॅम्प पेपरवर सह्या केल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला आहे. एवढेच नाही तर कागदपत्रांवर पीडितांकडून अंगठ्याचे ठसे घेण्यात आले. मात्र, महिलांकडे या कागदपत्रांच्या प्रती नाहीत. तर महेंद्र मेवाडा आणि महेंद्र चौधरी या दोघांनीही आरोप फेटाळून लावले आहेत.
महेंद्र मेवाडा यांनी पत्रकार परिषद बोलावून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करणार असल्याचे सांगितले, तर महेंद्र चौधरी यांनी कथित घटनेच्या वेळी आयुक्त नसून सर्व काही बनावट असल्याचे सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मंडळ अधिकारी तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, याआधी काही पीडित महिला तक्रारी घेऊन पुढे आल्या होत्या, परंतु चौकशीसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क माहिती चुकीची असल्याचे आढळून आले. या कारणास्तव गुन्हे दाखल झाले नाहीत.
संबंधित बातम्या