Rajasthan Assembly budget Session 2023 : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज विधानसभेत त्यांच्या चालू कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांच्याकडून मोठी चूक झाली. नजरचुकीनं गेहलोत यांनी जुने अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात केली. एका मंत्र्यानं ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ चूक सुधारली. मात्र, ही संधी साधत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. त्यामुळं सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावं लागलं.
बचत आणि दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचा दावा करत अशोक गेहलोत यांनी आपलं अर्थसंकल्पीय भाषण सुरू केलं. त्यांनी अर्थसंकल्पातील सुरुवातीचे दोन ते तीन उतारे वाचले. तेवढ्यात त्यांच्या मागे बसलेले मंत्री महेश जोशी जागेवरून उठले आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेले. मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगून त्यांनी भाषण थांबवायला सांगितलं. गेहलोत यांनी अजाणतेपणे मंत्र्याला कारण विचारलं. त्यावर, हा जुना अर्थसंकल्प आहे, असं जोशी हळूच म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी लगेचच पान उलटून तारीख पाहिली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. आपली फसगत झाल्याचं समजल्यावर तेही हसले.
या सगळ्या घडामोडींमुळं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आयतीच संधी साधली. अर्थसंकल्प लीक झाल्याचा आरोप करत भाजपच्या आमदारांनी गदारोळ केला. सभापतींनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. वारंवार आवाहन करूनही गोंधळ न थांबल्यानं सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं.
सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते गुबालचंद कटारिया यांनी अर्थसंकल्प लीक झाला असून तो मांडता येणार नाही, असा आरोप केला. मुख्यमंत्री गेहलोत यांनी मात्र हा आरोप फेटाळला. चुकून एक जास्त पान त्यात जोडलं गेलं. सभागृहात वितरित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची प्रतच आपण वाचत असल्याचं त्यांनी सांगितलं.
गेहलोत यांनी घोषणाबाजी करणार्या विरोधी सदस्यांना शांततेचं आवाहन करून अर्थसंकल्प मांडू देण्याची विनंती केली. मात्र, विरोधक शांत होत नव्हते. 'मुख्यमंत्र्यांनी चुकीबद्दल माफी मागावी. बजेटमध्ये चुकून भलतंच पान कुठून आलं, असा प्रश्न गुलाबचंद कटारिया यांनी केला. हा लोकशाहीचा अपमान आहे. अर्थसंकल्प वाचण्यासाठी आलेल्या अर्थमंत्र्यांच्या हाती भलताच कागद येणं हे राजस्थानचं दुर्दैव आहे, असं कटारिया म्हणाले.
संबंधित बातम्या