Raj Thackeray: महाराष्ट्रात 'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपट प्रदर्शित झाला तर...; राज ठाकरेंचा चित्रपटगृहमालकांना इशारा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Raj Thackeray: महाराष्ट्रात 'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपट प्रदर्शित झाला तर...; राज ठाकरेंचा चित्रपटगृहमालकांना इशारा

Raj Thackeray: महाराष्ट्रात 'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपट प्रदर्शित झाला तर...; राज ठाकरेंचा चित्रपटगृहमालकांना इशारा

Published Sep 22, 2024 06:35 PM IST

Raj Thackerays warns Maharashtra theatres: 'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपटावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील चित्रपटगृहमालकांना इशारा दिला आहे.

राज ठाकरेंचा चित्रपटगृहमालकांना इशारा
राज ठाकरेंचा चित्रपटगृहमालकांना इशारा

Raj Thackeray News: पाकिस्तानी सिनेमाला महाराष्ट्रात प्रवेश देणं महागात पडेल, असा अल्टिमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फवाद खानचा 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याआधी दिला. 'हा चित्रपट प्रदर्शित होईल त्याच सुमारास नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात कोणताही संघर्ष होऊ नये, अशी माझी इच्छा आहे', असेही राज ठाकरे म्हणाले.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांचा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' आता भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक बिलाल लशारी आणि माहिरा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर हे अपडेट शेअर केले. यानंतर राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

राज ठाकरे यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट एक्सवर लिहिले की, 'फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा,'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा चित्रप लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?'असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही

‘कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळे इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणे, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणे हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे. अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही’, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

चित्रपटगृहमालकांना इशारा

पुढे राज ठाकरे म्हणाले की, ‘याआधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका. हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे. त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे.’

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर