Brijbhushan Singh On Raj Thackeray : गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. मनसेनं उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. त्यामुळं राज ठाकरेंना ऐनवेळी अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येचा दौरा करत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे. या दौऱ्यावेळी खासदार बृजभूषण सिंह हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांचा सन्मान केल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
अयोध्येत माध्यमांशी बोलताना भाजपा खासदार बृजभूषण सिंह म्हणाले की, माझं राज ठाकरे यांच्याशी कधीही वैयक्तिक भांडणं नव्हते. अयोध्येचा दौरा रद्द करून त्यांनी माझ्यासह उत्तर भारतीयांचा सन्मानच केला आहे. उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि अयोध्येत यावं, अशी अट मी त्यांना ठेवली होती. परंतु त्यांनी अयोध्येचा दौरा रद्द करून एक प्रकारे आमचा सन्मानच केला आहे. आता त्यांनी अयोध्या दौरा केला तर माझ्यासकट त्यावर कुणालाही आक्षेप असणार नाही, असं म्हणत बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचं निमंत्रण दिलं आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्यानंतर भाजपा खासदार बृजभूषण सिंह हे चर्चेत आले होते. त्यानंतर अनेक महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यामुळं खळबळ उडाली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा अयोध्या दौरा झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळं आता राज ठाकरे आणि बृजभूषण सिंह यांच्यातील वाद मिटल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या