Wayanad : वायनाडमध्ये निसर्ग कोपला! भूस्खलनात चारगावे झाली जमीनदोस्त; बचाव कार्यात पावसाचा अडथळा, IMD चा रेड अलर्ट
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Wayanad : वायनाडमध्ये निसर्ग कोपला! भूस्खलनात चारगावे झाली जमीनदोस्त; बचाव कार्यात पावसाचा अडथळा, IMD चा रेड अलर्ट

Wayanad : वायनाडमध्ये निसर्ग कोपला! भूस्खलनात चारगावे झाली जमीनदोस्त; बचाव कार्यात पावसाचा अडथळा, IMD चा रेड अलर्ट

Jul 31, 2024 06:59 AM IST

Wayanad Land Slide update : वायनाडमध्ये दरड कोसळल्यामुळे आता पर्यंत १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी तिन्ही सैन्यदले व एनडीआरएफच्या तुकड्या वेगाने बचावकार्य राबावत आहेत. केरळमध्ये मंगळवार आणि बुधवारी दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

वायनाडमध्ये निसर्ग कोपला! भूस्खलनात चारगावे झाली जमीनदोस्त; बचाव कार्यात पावसाचा अडथळा, IMD चा रेड अलर्ट
वायनाडमध्ये निसर्ग कोपला! भूस्खलनात चारगावे झाली जमीनदोस्त; बचाव कार्यात पावसाचा अडथळा, IMD चा रेड अलर्ट

Wayanad Land Slide update : वायनाड येथे पावसाने कहर केला आहे. मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाने केरळमधील वायनाड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. पावसामुळे डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली असून, तब्बल चार गावे या भूस्खलनात वाहून गेली आहेत. आतापर्यंत १२३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १२८ नागरिक जखमी झाले आहेत. तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. तर अनेक लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने केरळच्या सर्व उत्तरेकडील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे.

दोन जेसीओ आणि लष्कराचे ४० जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. हवाई दलाची दोन हेलिकॉप्टरही मदतीसाठी पाठवण्यात आली आहेत. केरळमध्ये मंगळवार आणि बुधवारी दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला व मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. केरळमधील गेल्या सहा वर्षांतील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. या पूर्वी ऑगस्ट २०१८ मध्ये आलेल्या पुरात ४८३ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

चार तासांत तीन भूस्खलन; झोपेत काळाने घातला घाला

अधिकाऱ्यांनी सांगितले की, वायनाड जिल्ह्याच्या डोंगराळ भागात रात्री २ भूस्खलन सुरू झाले. सकाळी सहा वाजेपर्यंत दरड कोसळण्याच्या तीन घटनांची नोंद झाली आहे. या भूस्खलनाचा चार गावांना फटका बसला आहे. लोक झोपले होते, त्यामुळे त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. भूस्खलनामुळे अनेक घरे मातीच्या ढीगाऱ्यात दाबली गेली. तर वाहने वाहून गेली. येथील जलाशय पाण्याने तुडुंब भरले आहेत. तर झाडे उन्मळून पडली आहेत. प्रभावित भागात मुंडक्काई, चुरलमला, अट्टामला आणि नूलपुझा गावांचा समावेश आहे. आतापर्यंत ३४ मृतांची ओळख पटली आहे. त्यापैकी १८ जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

कोझिकोडमध्येही पूल आणि रस्ते वाहून गेले

मंगळवारी कोझिकोड जिल्ह्यातील विलांगडू आणि मलयांगडू भागातही भूस्खलन झाल्याने एक व्यक्ती बेपत्ता झाली, अनेक घरांचे नुकसान झाले आणि पूल आणि रस्ते वाहून गेले. अधिका-यांनी सांगितले की, मलंगडू पूल वाहून गेल्याने सुमारे १५ कुटुंबांचा मुख्य भागापासून संपर्क तुटला आहे. नदीकाठावर राहणाऱ्या लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले असून एनडीआरएफ टीमच्या नेतृत्वाखाली बचावकार्य सुरू आहे.

तिन्ही दले बचाव कार्यात गुंतले आहेत

१२२ इन्फंट्री बटालियन (TA) मद्रासच्या सेकंड-इन-कमांडच्या नेतृत्वाखाली २४ जवानाचे पथक बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. हे जवान बचाव कार्य राबावत आहेत. लष्कराचा अभियांत्रिकी गटही बचाव कार्यात गुंतला आहे. हवाई दलाचे एमआय-१७ आणि ध्रुव हेलिकॉप्टर मदतीसाठी पाठवण्यात आले आहेत. नौदलाचे ३० गोताखोरही देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. एझिमाला नेव्हल अकादमीचे नौदल पथकही बचाव कार्यात मदत करण्यासाठी वायनाडला पोहोचले आहे. प्रादेशिक लष्कराची एक बटालियनही घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. लष्करासह एनडीआरएफचे जवान देखील बचाव कार्यासाठी गुंतले आहेत. त्यांची चार पथके तैनात करण्यात आली आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, सहा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ६७ डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (DSC) कर्मचारी देखील रुग्णवाहिका आणि ट्रकमध्ये सामान भरल्यानंतर वायनाडला पोहोचले आहेत. जड मशिन आणि डॉगस्कॉड ची देखील मदत शोध मोहिमेत घेतली जाणार आहे.

छिन्नविछिन्न अवस्थेत सापडत आहेत मृतदेह

सूत्रांनी सांगितले की, बचाव कर्मचारी नद्या आणि चिखलातून लोकांच्या शरीराचे वेगवेगळे अवयव बाहेर काढत आहेत. छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडत आहेत. त्यामुळे या दुर्घटनेत नेमके किती लोक मारले गेले हे सांगणे कठीण झाले आहे. सापडलेले अवयव एकाच व्यक्तीचे आहेत की अनेकांचे हे स्पष्ट झालेले नाही. मृतांची ओळख पटवण्यासाठी स्थानिकांची मदत घेतली जात आहे. मृतांमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

राजनाथ यांनी लष्करप्रमुखांशी चर्चा केली

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि भूस्खलनग्रस्त वायनाडमधील बचाव आणि मदत कार्याची माहिती घेतली.

मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट'

भूस्खलनग्रस्त वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बचावकार्यावर परिणाम होण्याची चिंता वाढली आहे. विभागाने मंगळवारी वायनाड आणि त्याच्या शेजारील मलप्पुरम, कोझिकोड आणि कन्नूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला. पुढील वीस तासांत या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील सात दिवस राज्यभर अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर