Toronto Rain Tax: आत्तापर्यंत तुम्ही मालमत्ता कर, दळणवळण कर, पाणी पट्टी, घरपट्टी, टोल या सारख्या करांची नावे ऐकली असतीलच. या करवासुलीच्या माध्यमातून सरकार मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करत असतं. काही शहरात विविध गोष्टींवर कर लावला जातो जसे करमणूक कर, उद्यान कर आदि. मात्र, तुम्ही कधी पावसावर कर लावल्याचे ऐकले आहे का? नाही ना! तुमचा विश्वास बसणार नाही मात्र, एका शहराने आता पावसासाठी रेन टॅक्स सुरू केला आहे. शहरात पर्जन्य कर लावला, तर पहिला प्रश्न मनात येईल की पाऊस कर का लावला जाऊ शकतो? पण सर्वात आधी हे जाणून घ्या की जगातील कोणत्या शहरात हा पाऊस कर लागू करण्यात आला आहे.
कॅनडामध्ये पुढील महिन्यापासून लोकांना रेन टॅक्स भरावा लागू शकतो. कॅनडाच्या टोरंटो शहरात ही नवी कर प्रणाली लागू केली जाणार आहे. स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटची समस्या सोडवणे हा या करवसूली मागचा उद्देश आहे. टोरंटो सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, म्युनिसिपल ऑथॉरिटी 'रेन टॅक्स' लागू करण्याचा विचार करत असून ही नवी कर प्रणाली पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये लागू केली जाणार आहे.
टोरंटो प्रशासनाची अधिकृत वेबसाइट नुसार, "सरकार पाणी वापरणारे आणि शहरात येणाऱ्या वादळाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी "स्टॉर्मवॉटर चार्ज आणि वॉटर सर्व्हिस चार्ज कन्सल्टेशन" कार्यक्रमावर प्रशासन काम करत आहे.
या पर्जन्य कराच्या संभाव्य अंमलबजावणीबाबत अधिकारी लोकांकडून आणि इच्छुक पक्षांकडून सध्या सूचना आणि प्रतिक्रिया मागवत आहेत. शहरात पाणी वापरकर्त्यांना 30 एप्रिलपूर्वी सर्वेक्षण करण्याचे आवाहन देखील शहर प्रशासाने केले आहे.
टोरंटो प्रशासनाच्या अधिकृत सरकारी वेबसाइट नुसार , "वादळाचे पाणी म्हणजे पाऊस आणि वितळलेला बर्फ. जेव्हा जमिनीद्वारे शोषले जात नाही, तेव्हा वादळाचे पाणी जमिनीच्या पृष्ठभागांवर, रस्त्यावरून नाल्यांमध्ये वाहते. या साठी काही खास जलमार्ग बांधण्यात आले आहेत.
वेबसाइटने नमूद केले आहे की मोठ्या प्रमाणात वादळाचे पाणी शहराच्या ड्रेनेज सिस्टमला व्यापून टाकू शकते, ज्यामुळे पूर येण्याची शक्यता आहे. हे पाणी शहराच्या नद्या, नाले आणि तलावात मिसळल्याने त्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो.
टोरंटोनिअन नागरिक मोठ्या प्रमाणात पाणी पट्टी भरत असतात. यात वादळाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाचा खर्च देखील समाविष्ट असतो. शहराच्या प्रशासनाच्या वेबसाइट नुसार, "स्टॉर्म वॉटर चार्ज शहराच्या ड्रेनेज प्रणालीमध्ये वादळाच्या पाण्याच्या प्रवाहाच्या संदर्भात मालमत्तेच्या प्रभावावर आधारित असून हे जमिनीचा कठोर पृष्ठभाग या माध्यमातून दर्शवला जातो कठीण पृष्ठभागांमध्ये छप्पर, डांबरी मार्ग, पार्किंग क्षेत्र आणि काँक्रीटचा समावेश होतो. यामुळे पाणी जमिनीत न मुरता ड्रेनेज यंत्रनेद्वारे शहरा बाहेर सोडले जाते.
संबंधित बातम्या