पती-पत्नीच्या भांडणाचा फटका भारतीय रेल्वेला बसला असून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. पती-पत्नीमधील घरातील भांडण घराबाहेर पडल्यावर त्याचा फटका भारतीय रेल्वेला सोसावा लागला, कारण दोघांमधील भांडणामुळे रेल्वेला तीन कोटींचे नुकसान झाले आहे. यानंतर पतीला नोकरी गमवावी लागली, म्हणजेच त्याला रेल्वेने सेवेतून निलंबित केले. प्रकरण पुढे आणखी गुंतागुंतीचे होत गेले व न्यायालयापर्यंत पोहोचले. या सर्व प्रकारानंतर पतीने पत्नीपासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. एका 'ओके'मधून एवढा मोठा गोंधळ कसा निर्माण झाला, हे प्रकरण अतिशय रंजक आणि आश्चर्यकारक आहे.
विशाखापट्टणमचा हा व्यक्ती स्टेशन मास्तर म्हणून नोकरीला आहे. ड्युटीवर असताना दोघांमध्ये फोनवर भांडण झाले होते. तो एका हातात बायकोशी आणि दुसऱ्या हातात ऑफिसचा फोन घेऊन बोलत होता. भांडणादरम्यान पत्नी फोनवर म्हणाली की, घरी ये, मग आपण बोलू. त्यावर नवरा म्हणाला "ठीक आहे." मात्र त्याने हे ऑफिसच्या फोनवर म्हटल्याने दुसऱ्या स्टेशन मास्तरांना वाटलं की हे त्याच्यासाठी ठीक आहे. त्यामुळे त्यांनी ट्रेन सोडण्याचा सिग्नल दिला. ट्रेन ज्या मार्गाने गेली त्या मार्गावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे रेल्वेला ४ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
नवरा-बायकोमध्ये आधीच भांडण होतं. रेल्वेचे नुकसान झाल्यानंतर पतीला निलंबित करण्यात आले. त्यानंतर पतीने घटस्फोटासाठी विशाखापट्टणम फॅमिली कोर्टात धाव घेतली. घटस्फोटाचे प्रकरण समोर येताच हे प्रकरण वाढू लागले आणि पती-पत्नी दोघांकडूनही आरोप प्रत्यारोप होऊ लागले. पतीचा आरोप आहे की, पत्नी अजूनही प्रियकरासोबत रिलेशनमध्ये असून त्याला भेटत असते तर पत्नीने सासू-सासऱ्यांवर हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळाची तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर पतीचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपीही तिने केला आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.