Passenger Train Ticket price cut : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं रेल्वे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. रेल्वेनं प्रवासी भाड्यात थेट ४० ते ५० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. त्यामुळं रेल्वेच्या प्रवासी तिकिटांचे दर आता कोविड महामारीच्या आधीच्या पातळीपर्यंत खाली गेले आहेत. नवे दर २७ फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.
याआधी रेल्वे प्रवाशांना पॅसेंजर ट्रेनच्या प्रवासासाठी एक्स्प्रेस ट्रेनचं भाडं द्यावं लागत होतं. मात्र, आता भारतीय रेल्वेनं 'पॅसेंजर ट्रेन्स'साठी द्वितीय श्रेणीचे सर्वसाधारण तिकीट दर लागू केले आहेत. पॅसेंजर ट्रेन्स आता 'एक्स्प्रेस स्पेशल' किंवा 'MEMU/DEMU एक्सप्रेस' ट्रेन म्हणून ओळखल्या जातात.
इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळपासून रेल्वे अधिकाऱ्यांनी मुख्य बुकिंग आरक्षण पर्यवेक्षकांना या बदलाची माहिती दिली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सर्व मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (MEMU) ट्रेन आणि ‘शून्य’ अंकानं सुरू होणाऱ्या गाड्यांवरील सर्वसाधारण वर्गाच्या भाड्यात सुमारे ५० टक्के कपात केली आहे.
याशिवाय, अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) ॲपमध्ये भाड्याच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी पॅसेंजर ट्रेन म्हणून गणल्या जाणाऱ्या व आता 'एक्स्प्रेस स्पेशल' किंवा मेमू ट्रेन म्हणून चालवल्या जाणाऱ्या सर्व गाड्यांना ही भाडे कपात लागू होणार आहे.
२०२० मध्ये कोविड महामारीनं देशात शिरकाव केल्यानंतर रेल्वेनं टप्प्याटप्प्यानं 'पॅसेंजर गाड्या' बंद केल्या होत्या. कोविड आटोक्यात आल्यानंतर व परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पॅसेंजर ट्रेनचे किमान तिकीट १० रुपयांवरून थेट ३० रुपये करण्यात आलं. या माध्यमातून एक्स्प्रेस ट्रेनच्या भाड्याशी त्याची सांगड घालण्यात आली होती. आता त्यात बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अनेक स्थानकांदरम्यानचे तिकीट दर कमी करण्यात आले आहेत. ही कपात गुरुवारपासून लागू झाली आहे, असं बियाणी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.
संबंधित बातम्या