Viral News: दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वेत प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हेतर सध्या प्लॅटफॉर्मवरही पाय ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सोशल मीडियावर रेल्वेतील असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही म्हणून एका तरुणाने सेल्फ मेड सीट तयार केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ १४ सेंकदाचा आहे. व्हिडिओत दिसत आहे की, खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये दोन बर्थच्या मधोमध बंकप्रमाणे दोरी विणण्यात आली. तर, तरुण सेल्फ मेड सीटवर चढताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे? हे समजू शकलेले नाही. तरुणाने लढवलेली शक्कल पाहून इतर प्रवासी थक्क झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर तरुणाच्या देशी जुगाडाचे कौतुक केले जात आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या देशातील रेल्वे प्रवासी आश्चर्यकारक आहेत. परंतु, अतिशय सर्जनशील आणि लढाऊ देखील आहेत, असे एकाने म्हटले आहे. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, अशा सुविधा अजूनही केवळ प्रीमियम गाड्यांमध्येच मिळत आहे, लवकरच सर्व गाड्यांमध्ये नवीन बर्थची सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, आत्मनिर्भर भारतानंतर आत्मनिर्भर भारतीय आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, ही कल्पना देशाबाहेर जाता कामा नये.
भारतीय रेल्वेने आगामी दिवाळी आणि छठ पूजा सणासाठी २०० हून अधिक विशेष गाड्यांची घोषणा केली होती. दरम्यान, २९ ऑक्टोबरपासून विशेष गाड्या धावत आहे. या सर्व गाड्या दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल, उत्तर प्रदेशातील वाराणसी जंक्शन, पुणे जंक्शन आदी राज्यांतील प्रमुख जंक्शनना जोडणार आहेत. याशिवाय, रेल्वे बोर्डाने सुमारे २० 'फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन'ची घोषणा केली.सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी भरून काढण्यासाठी सध्याच्या गाड्यांव्यतिरिक्त अनेक जादा डब्यांसह विशेष गाड्या सुरू करण्यात आल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली होती.
प्लॅटफॉर्म तिकीट विक्री ८ नोव्हेंबरपर्यंत बंद पश्चिम रेल्वे सणासुदीसाठी २०० गाड्या चालवत आहे. यापैकी सुमारे ४० गाड्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत चालविल्या जातात. त्यापैकी २२ गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या गंतव्यस्थानाकडे जात आहेत. वांद्रे येथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर टर्मिनस सह सुरत, उधना, वडोदरा आणि अहमदाबाद सारख्या स्थानकांवर ही गर्दी हाताळण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.