Amrit Bharat Train : भारतीय रेल्वेमधून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. प्रवाशांना सुविधा पुरवण्यासाठी रेल्वे प्रशासन सतत प्रयत्न करत असते. आता भारतीय रेल्वेने ५० नवीन अमृत भारत ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. देशातील पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन ३० डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले गेले होते.
सुरू असलेल्या अमृत भारत ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता ५० नव्या अमृत भारत ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी एक्सवर अमृत भारत ट्रेनचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. अमृत भारत ट्रेनला २२ डबे आहेत. १२ द्वितीय श्रेणी आणि ८ सामान्य श्रेणीचे डबे आहेत. याशिवाय गार्डचे दोन डबे आहेत. रेल्वेने दिव्यांगांच्या सुविधांची विशेष काळजी घेतली आहे.
अमृत भारत ट्रेनमध्ये असेल पुश-पुल टेक्नोलॉजीचा वापर -
अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवासी कमी प्रवास भाड्यात सर्वसुविधायुक्त प्रवास करू शकतील. अमृत भारत ट्रेनमध्ये पुश-पुल टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नोलॉजीमुळे ट्रेन तत्काळ गती पकडते तसेच लगेच थांबवता येते. यामुळे एखादे वळण किंवा पुलावरून जाताना प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. पुशपुल टेक्नोलॉजी अर्थ आहे की, या ट्रेनला दोन इंजिन असतील. एक पुढे व एक मागे. पुढचे इंजिन गाडीला ओढण्याचे काम करेल तर मागचे इंजिन गाडीला पूश करण्याचे काम करेल.
अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये मेट्रोसारखे गँगवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतात. प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉइंट देण्यात आले आहेत. बॉटल होल्डर देण्यात आला आहे. अशा अनेक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच कवच यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरांची नजर, बायो-वॅक्युम टॉयलेट्स, सेंसरवर आधारित नळ, प्रवाशांच्या माहितीसाठी सूचना फलक, एलईडी लाइट्सचा उत्तम वापर, अशा काही गोष्टी अमृत भारत ट्रेनमध्ये दिल्या गेल्या आहेत.