Raigad Minor Girl Rape : रायगड जिल्ह्यातील वारसे गावात अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता सहावीत शिकते. पीडिताची आई बाहेर असल्याने तिच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पहिली घटना ३० डिसेंबर २०२४ रोजी घडली होती. पीडित मुलगी सायकलवरून घरी जात असताना मुख्य आरोपीने तिला घरी बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला, अशी माहिती रोहाचे उपअधीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.
दरम्यान, २ जानेवारी आणि ३ जानेवारी रोजी आरोपीने पुन्हा पीडितावर अत्याचार केले. मात्र, यानंतर पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या एका नातेवाईकाला सांगितला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नातेवाईकाने पीडिताच्या आईला माहिती दिली आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्याचा निर्णय घेतला. हे कुटुंब पोलीस ठाण्यात जात असताना मुख्य आरोपीच्या दोन भावांनी त्यांचा रस्ता अडवून गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षी १०७ बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या, यात ७४ अल्पवयीन मुलींचा समावेश होता. म्हणजेच जिल्ह्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी ७३ टक्के गुन्हे हे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराशी संबंधित आहेत, जी चिंतेची बाब आहे. मुंबई आणि ठाणे सारख्या महानगरांच्या अगदी जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यात २०१९-२० या कालावधीत पर्यंत रायगड जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक हिंसाचाराचे सरासरी ५० गुन्हे दाखल झाले होते. महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात कठोर कायदे आहेत. मात्र, तरीही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. उलट अशा घटनेत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. २०१९- २० पर्यंत रायगड जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे सरासरी वार्षिक ५० गुन्हे दाखल होत होते. गेल्या तीन वर्षांत महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी १०० गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. यातही पॉस्को अर्थात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे
संबंधित बातम्या