Rahul Gandhi news : हरयाणा व जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीर व हरयाणाच्या जनतेचे त्यांनी आभार मानले आहेत. त्याचवेळी, हरयाणातील अनेक मतदारसंघांतून आलेल्या तक्रारींची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये झालेला इंडिया आघाडीचा विजय हा संविधानाचा आणि लोकशाहीच्या स्वाभिमानाचा विजय आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
हरयाणामध्ये काँग्रेसच्या झालेल्या अनपेक्षित पराभवावरही राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. ‘हरयाणाच्या अनपेक्षित निकालांचं आम्ही विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या तक्रारींची माहिती निवडणूक आयोगाला देणार आहोत. हरयाणाच्या सर्व जनतेनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि वाघासारखं काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार, असं राहुल यांनी म्हटलं आहे. 'हक्क, सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय आणि सत्यासाठी आमचा संघर्ष यापुढंही सुरूच राहील, जनतेसाठी आवाज उठवत राहू, असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.
काँग्रेसनं हरयाणा विधानसभा निवडणुकीत मोठा जोर लावला होता. राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राज्यातील नेत्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली होती. कुस्तीपटूंचं आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि जाट समाजाची नाराजी हे मुद्दे काँग्रेसनं प्रचारात आणले होते. या सगळ्याच्या जोरावर काँग्रेस बाजी मारेल असा अंदाज होता. मात्र तो फोल ठरला आहे. भारतीय जनता पक्षानं अनपेक्षितपणे सत्ता राखत हॅटट्रिक केली आहे. विधानसभेच्या ९० जागांपैकी भाजपनं ४८ जागांसह निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. तर, काँग्रेसला केवळ ३७ जागा मिळाल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सनं ४२ जागा जिंकल्या आहेत. तर, भाजपला २९ जागा मिळाल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनं ६ जागा जिंकल्या आहेत.