Rahul Gandhi lok Sabha Election : काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून लढवणार असल्याची माहिती आली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय राय यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
कमिटीचे अध्यक्ष अजय राय यांनी वाराणसी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर उत्तर देताना अजय राय म्हणाले, यावेळी देखील राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत. प्रियंका गांधी यांना देखील आमचं पूर्ण समर्थन असणार आहे.
काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष अजय राय म्हणाले की, अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. अमेठी लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस कुटुंबियांचं खास नातं आहे. याच मतदारसंघातून याआधी संजय गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. राहुल गांधी यांनीही सलग तीन वेळा अमेठी मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. पण, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी २०१९ मध्ये काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला. अमेठी मतदार संघात राहुल गांधी यांचा स्मृती ईराणी यांनी पराभव केला होता. प्रियंका गांधींबाबत अजय राय म्हणाले की, जर प्रियंका गांधी यांची निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तर, त्या वाराणसीमधून निवडणूक लढवू शकतात. त्यांच्यासाठी आमचे कार्यकर्ते काहीही करायला तयार आहेत.
काँग्रेस नेते अजय राय पुढे म्हणाले की, मोदी सरकार ईडी, सीबीआयची भीती दाखवत आहे. राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांचा संदेश हा कार्यकर्त्यांच्या घरा-घरात पोहोचवणार आहे.