No trust motion voting : विरोधी पक्षाकडून आज मणिपूर हिंसाचारावरून संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसने खासदार गौरव गोगई यांनी लोकसभेत हा अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर १० ऑगस्टपर्यंत चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी या प्रस्तावाला उत्तर देतील. सुरुवातीला सांगण्यात आले होते की, राहुल गांधी या अविश्वास प्रस्तावावर पहिल्यांदा चर्चा करतील त्याचबरोबर राहुल गांधीच हा प्रस्ताव सादर करतील. मात्र प्रत्यक्षात गौरव गोगई यांनी प्रस्ताव मांडला. आज राहुल गांधी सभागृहात उपस्थित नव्हते. यावरून भाजपचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल आणिकाँग्रेसला चिमटा काढला आहे.
मोदी आडनावावर टीका केल्यानंतर सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा दिल्यानंतर संसद सचिवालयाने त्यांची खासदारकी काढून घेतली होती. तसेच त्यांचे सरकारी निवासस्थानही काढून घेण्यात आले होते. नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल केली. त्यानंतर राहुल आज अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होतील तसेच याची सुरुवात करतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यानंतर, अविश्वास प्रस्तावाला विरोध दर्शवताना निशिकांत दुबे यांनी म्हटले की, सरकारच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी येणार असल्याचे आम्ही यापूर्वी ऐकत होतो, मात्र ते आले नाहीत. कदाचित ते आज सकाळी उशिरा उठले असतील. त्यांना उशिरा जाग आली असेल. म्हणून गौरव गोगई यांनी प्रथम चर्चा सुरू केली.
दुबे म्हणाले की, अविश्वास ठरावाला माझा विरोध आहे. मणिपूरची चर्चा झाली. एवढ्या महत्त्वाच्या विधेयकावर बोलण्यासाठी पक्षाने मला उभे केले, ही महत्त्वाची बाब आहे. पण काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी न बोलणे हे भाषण लहान करण्याचा प्रकार आहे.
यासाठीच त्यांनी गुगली टाकल्यासारखे केले. गौरव गोगई हौतात्म्याबद्दल बोलत होते. पण संपूर्ण काँग्रेसला हौतात्म्याची काहीच माहिती नाही. तुम्हाला मणिपूरबद्दलही माहिती नसेल. तुमच्यापैकी बरेच जण मणिपूरला गेलेही नसतील. मी मणिपूरच्या इतिहासाचा साक्षीदार आहे.