मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार, प्रियंका वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात!

राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार, प्रियंका वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात!

Jun 17, 2024 07:49 PM IST

Rahul Gandhi : राहुल गांधी रायबरेली मतदारसंघ कायम ठेवणार असून वायनाड लोकसभेची जागा सोडणार आहेत. प्रियंका गांधी वायनाडमधून लोकसभेची पोट निवडणूक लढणार आहे.

प्रियांका वायनाडमधून निवडणूक लढवणार
प्रियांका वायनाडमधून निवडणूक लढवणार

राहुल गांधी रायबरेली मतदारसंघ कायम ठेवणार असून वायनाड लोकसभेची जागा सोडणार आहेत. वायनाडमधून प्रियंका गांधी पोट निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राहुल गांधी रायबरेलीतून खासदार कायम राहतील. त्याचबरोबर त्यांनी वायनाड सीट सोडण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर म्हटले की, येथून प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढतील.

यावेळी त्यांनी प्रियंका गांधी यांची जुनी स्लोगन'लडकी हूं, लड सकती हूं' चा वापर करत म्हटले की, त्या वायनाडमधून पोट निवडणूक लढतील. त्याचबरोबर काँग्रेसने एकाचवेळी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. एक म्हणजे राहुल गांधी रायबरेलीतून खासदार कायम राहतील, त्याचबरोबर काँग्रेसने वायनाड पोटनिवडणुकीत आपला उमेदवार जाहीर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी वायनाड लोकसभा सीट सोडण्याचा निर्णय घेतला तसेच आपला पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून कायम राहण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधींनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवरून केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेश राज्यातील रायबरेलीमधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. नवी दिल्लीत पार्टी प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत या निर्णयाची घोषणा केली.

राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि लाखोंच्या मताधिक्याने जिंकली होती. निवडणूक निकालानंतर १४ दिवसांच्या आत त्यांना एक जागा सोडावी लागणार होती.

यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रियांका गांधी वाड्रा यावेळी उपस्थित होते. त्यानंतर खर्गे म्हणाले की, पक्षाने निर्णय घेतला आहे की राहुल गांधी यांनी रायबरेलीची जागा कायम ठेवावी कारण ती कुटुंबाच्या जवळची आहे.

प्रियांका यांनी वायनाडमधून निवडणूक लढवावी, असा निर्णय आम्ही घेतला आहे, असे सांगून खर्गे यांनी हा निर्णय स्वीकारल्याबद्दल भाऊ-बहिणीचे आभार मानले. प्रियांका गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

या घोषणेनंतर राहुल गांधी यांनी वायनाडचे खासदार म्हणून आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना म्हणाले की, रायबरेली आणि वायनाडच्या जनतेशी माझे भावनिक नाते आहे. संसद सदस्य म्हणून गेली पाच वर्षे काम करण्याचा एक विलक्षण अनुभव आहे. वायनाडची जनता माझ्या पाठीशी उभी राहिली, प्रेम आणि आपुलकी दिली आणि अत्यंत कठीण काळात लढण्याची ऊर्जा दिली. हे मी कधीच विसरू शकणार नाही.

वायनाडशी असलेल्या संबंधांना आश्वस्त करताना ते पुढे म्हणाले की, प्रियांका वायनाडमध्ये निवडणूक लढवणार आहेत, हे वायनाडमधील प्रत्येकाला कळावे अशी माझी इच्छा आहे, परंतु मी वायनाडला वारंवार भेट देणार आहे. पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीनेही राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केली आहे आणि सीडब्ल्यूसीच्या ८ जून रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला होता.

 

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर