दुसऱ्या कुठल्या देशात असते तर मोहन भागवत यांना अटक झाली असती! असं का म्हणाले राहुल गांधी?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दुसऱ्या कुठल्या देशात असते तर मोहन भागवत यांना अटक झाली असती! असं का म्हणाले राहुल गांधी?

दुसऱ्या कुठल्या देशात असते तर मोहन भागवत यांना अटक झाली असती! असं का म्हणाले राहुल गांधी?

Jan 15, 2025 12:25 PM IST

Rahul Gandhi on Mohan Bhagwat : स्वातंत्र्याचा संबंध राम मंदिर उभारणीशी जोडणाऱ्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे.

दुसऱ्या कुठल्या देशात असते तर मोहन भागवत यांना अटक झाली असती! काय म्हणाले राहुल गांधी?
दुसऱ्या कुठल्या देशात असते तर मोहन भागवत यांना अटक झाली असती! काय म्हणाले राहुल गांधी?

Rahul Gandhi : अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतरच देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं, असं वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे. ‘भागवत यांचं हे वक्तव्य म्हणजे देशद्रोह आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. दुसऱ्या कुठल्या देशात असं बोलले असते तर त्यांना अटक झाली असती,’ असं राहुल यांनी म्हटलं आहे.

‘अयोध्येतील रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस 'प्रतिष्ठा द्वादशी’ म्हणून साजरी करावी, कारण अनेक शतकांपासून शत्रूंच्या हल्ल्यांना तोंड देत असलेल्या देशाला याच दिवशी खरं स्वातंत्र्य मिळालं, असं विधान भागवत यांनी केलं होतं. त्यावर राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस पक्षाचं नवीन मुख्यालय इंदिरा भवनच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी यावर भाष्य केलं. 'मोहन भागवत (Mohan Bhagwat) जे बोलले तो एक प्रकारचा देशद्रोहच आहे. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की राज्यघटना बेकायदेशीर आहे, इंग्रजांविरुद्धची लढाई बेकायदेशीर आहे. इतर कोणत्याही देशात त्यांना आतापर्यंत अटक झाली असती आणि त्यांच्यावर खटला भरला गेला असता. असल्या बकवास गोष्टी ऐकणं आता बंद झालं पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसच आरएसएसचा अजेंडा रोखू शकते!

'हा दोन विचारधारांमधील संघर्ष आहे. एकीकडं आमचा विचार संविधानाचा आहे आणि दुसरीकडं आरएसएसचा (RSS) संविधान विरोधी विचार आहे. भाजप आणि आरएसएसच्या या अजेंड्याविरुद्ध ‘देशात दुसरा कोणताही पक्ष लढू शकत नाही. त्यांना फक्त काँग्रेसच रोखू शकते,’ असं राहुल गांधी म्हणाले.

निवडणूक आयोगाच्याही स्वच्छतेची गरज

'विरोधी पक्षाच्या नेत्यांना नामोहरम करण्यासाठी, त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. निवडणूक आयोगाचीही स्वच्छता करण्याची गरज आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीची आकडेवारी द्यायला नकार देत आहे. अशा स्थितीत निवडणूक यंत्रणा योग्य आहे याची खात्री कशी बाळगायची? निवडणूक पारदर्शक पद्धतीनं होत असल्याचं सिद्ध करणं निवडणूक आयोगाचं काम आहे, परंतु तसं केलं जात नाही. काँग्रेसचे लोक या सर्वांविरुद्ध लढत असल्यानं आमच्या पक्षाचं नुकसान होतंय, असंही राहुल म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर