विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत भगवान शिवसह विविध धर्माच्या देवांचे पोस्टर दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राहुल यांनी भाजपच्या नेत्यांकडे इशारा करत ‘स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारे हिंसा आणि द्वेषात गुंतलेले आहेत’, असा टोमणा मारला. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याने लोकसभेत बराच गदारोळ निर्माण झाला होता.
लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेत विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी सहभाग घेतला. त्यंनी लोकसभेतील भाषणाची सुरुवात ‘जय संविधान’ या घोषणेने केली. ‘निर्भय’ आणि ‘अहिंसा’ या विषयावर बोलताना राहुल गांधी यांनी सोबत आणलेल्या अनेक धर्मगुरुंची पोस्टर्स लोकसभेत दाखवले.
राहुल गांधी म्हणाले, ‘हिंदू कधीही भीती आणि द्वेष पसरवू शकत नाहीत हे तुम्ही भगवान शिवाची प्रतिमा पाहिल्यास कळेल, असं राहुल गांधी म्हणाले. परंतु भाजप दिवस-रात्र भय आणि द्वेष पसरवते आहे. आमचे सर्व महापुरुष हे अहिंसा, निर्भयता आणि सर्वधर्मसमभाव याबद्दल बोलतात. परंतु जे स्वत: फक्त हिंदू बोलतात ते हिंसा, द्वेष आणि खोटंपणाबद्दल बोलतात... आप हिंदू हो ही नही (तुम्ही हिंदू नाही),’ असंही राहुल गांधी यांनी भाजपच्या नेत्यांना उद्देशून म्हणाले.
विरोधी पक्षनेते म्हणून पहिल्यांदाच लोकसभेत भाषण करणाऱ्या राहुल गांधी यांच्या भाषणातील ‘हिंदू’ या टिप्पणीने सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी गदारोळ करत जोरदार निषेध केला. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या बाकावरून उठून उभे राहिले आणि राहुल यांच्या भाषणात व्यत्यय आणला. संपूर्ण हिंदू समाजाला ‘हिंसक’ म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना संबोधित करताना केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी शीख धर्माचे गुरुनानक, खिश्चन धर्माचे येशू ख्रिस्त, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध, जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर यांच्या प्रतिमा सभागृहात दाखवून सर्वांच्या मुद्रा या अभय मुद्रा असल्याचं सांगितलं. कुराणातील एक अवतरण असलेले फलक देखील राहुल गांधी यांनी प्रदर्शित केले. हिंदू, इस्लाम आणि शीख धर्मासह सर्व धर्म धैर्य आणि निर्भय असण्याचं महत्त्व सांगतात आणि त्यावर अधिक भर देतात, याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी आपल्या लोकसभेतील भाषणात केला.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राहुल गांधी यांचं भाषण सुरू असताना हरकतीचा मुद्दा मांडत उभे राहिले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वतःची हिंदू म्हणून अभिमानाने ओळख बाळगणाऱ्या करोडो लोकांच्या भावना दुखावल्या असल्याचं सांगितलं. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी अमित शाह यांनी यावेळी सभागृहात केली.
तथापि, राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर पलटवार करत मी फक्त भाजपबद्दल बोलत असून संपूर्ण हिंदू समाजाबद्दल बोलत नाही, असं स्पष्ट केलं. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) किंवा मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाहीत, असंही राहुल गांधी म्हणाले.
संबंधित बातम्या