Rahul Gandhi Press Conference : काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्याच्या कारवाईवर खासदार राहुल गांधी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘निवडणुकीचा प्रचार करायलाही आमच्याकडं पैसे नाहीत. मात्र कोणतंही न्यायालय, मीडिया किंवा निवडणूक आयोग यावर बोलायला तयार नाही. सगळे गप्प बसून ड्रामा बघत आहेत,’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राजधानी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व सोनिया गांधी या देखील यावेळी उपस्थित होत्या. 'काँग्रेसची बँक खाती महिनाभरापूर्वी गोठवण्यात आली होती. एखादी संस्था, कंपनी किंवा कुटुंबाच्या बाबतीत असं घडलं असतं तर ते संपूनच गेले असते. इतकी मोठी कारवाई आमच्यावर झाली. मात्र, यावर कोणतंही न्यायालय, मीडिया किंवा निवडणूक आयोग बोलायला तयार नाही. सगळे गप्प बसून नाटक बघत आहेत. ही भारतातील लोकशाही आहे, असा त्रागा राहुल यांनी व्यक्त केला.
‘ज्या पक्षाला भारतातील २० टक्के लोकांनी मतदान केलं आहे, तो पक्ष आपल्या नेत्याला कुठंही पाठवू शकत नाही किंवा रेल्वे तिकीट खरेदी करू शकत नाही. आम्ही जाहिराती करू शकत नाही. एखाद्याला दोन रुपये देण्यासारखीही आमची परिस्थिती नाही. जिथं प्रमुख विरोधी पक्षाची खाती बंद केली जातात, तिथं लोकशाही कशी असू शकते? भारतात लोकशाही आहे असं म्हणणं हा खोटेपणा आहे. साफ खोटं आहे. भारतात आज लोकशाही राहिलेली नाही,’ असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही हल्लाबोल केला. ‘बँक खाती गोठवणं ही काँग्रेसच्या विरोधातील फौजदारी कारवाई आहे. ही कारवाई नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केली आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
या मुद्द्यावर न्यायालयं आणि निवडणूक आयोग ठाम भूमिका घेऊ शकतात, परंतु त्यांच्याकडून साधी प्रतिक्रिया देखील देण्यात आली नाही. निवडणूक आयोग या विषयावर गप्प का आहे, असा सवाल राहुल यांनी केला.
भाजपनं हे पाऊल उचलून केवळ काँग्रेसचं खातंच गोठवलं नाही तर संपूर्ण लोकशाही गोठवली आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार, जास्तीत जास्त १० हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. मात्र काँग्रेसकडून कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले आणि पक्षाची खातीही बंद करण्यात आली, असा आरोप राहुल यांनी केला.