मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार; ‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीआधीच घोषणा

Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार; ‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीआधीच घोषणा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 27, 2023 12:42 PM IST

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीकडून मुंबईत बैठक घेतली जाणार आहे.

Congress leader Rahul Gandhi
Congress leader Rahul Gandhi (PTI)

Rahul Gandhi PM Candidate : येत्या ३१ ऑगस्टला मुंबईत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. देशातील २६ विरोधी पक्षांचे नेते बैठकीसाठी मुंबईत येणार आहे. त्यापूर्वीच आता राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी 'राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार', असणार असल्याचं जाहीर केलं आहे. २०२४ च्या निवडणुकीचे निकाल पंतप्रधान कोण होणार हे ठरवतील. परंतु राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार असल्याचा दावा मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, २०१४ साली भाजपला केवळ ३१ टक्के मतं मिळाली होती. ६९ टक्के मतं त्यांच्या विरोधात होते. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहंकार दाखवू नये. इंडिया आघाडीच्या बैठका सुरू झाल्यापासून एनडीएत खळबळ माजलेली आहे. याशिवाय देशातील जनताही मोदी सरकारच्या कारभाराला कंटाळलेली आहे. जनतेच्या दबावामुळं विरोधक एकवटले असून राहुल गांधी हेच काँग्रेसचे २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी जनतेला जी आश्वासनं दिली होती, ती अद्यापही पूर्ण झालेली नाही, असंही गेहलोत यांनी म्हटलं आहे.

केंद्रातील मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. पाटणा, बंगळुरू नंतर आता ३१ ऑगस्टला मुंबईत इंडिया आघाडीच्या नेत्यांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटप, तिकिटवाटप यांसह अन्य महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विरोधकांची चर्चा होणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात येणार आहे. परंतु मुंबईतील बैठकीपूर्वीच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधानपदाच्या नावाची घोषणा केल्यानंतर इंडिया आघाडीत संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

WhatsApp channel