काँग्रेस नेते राहुल गांधी लग्न करणार की नाही, याबाबत अनेक ठिकाणी नागरिक त्यांना सतत प्रश्न विचारत असतात. विरोधी पक्षातील नेते सुद्धा त्यांना अधनंमधनं लग्न करण्याबाबत टोमणे मारत असतात. राहुल गांधी हे अनेक ठिकाणी याविषयावर बोलणे टाळतात… किंवा कमी बोलतात. सध्या काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये काही निवडक कॉलेज तरुणींशी मनमोकळेपणाने चर्चा केली. यात शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षितता पासून देशाचं राजकारण आणि लग्न याबद्दल चर्चा होती. साहजिकच, या कॉलेज तरुणींना राहुल गांधी यांना सुद्धा, ‘तुम्ही लग्न कधी करणार’ असा प्रश्न विचारलाच. त्यावेळी राहुल गांधी यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिलं. या चर्चेचा व्हिडिओ खुद्द राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला असून आत्तापर्यंत ४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत राहुल गांधी लिहितात, ‘ तुमच्यावर कुटुंबाकडून लग्नाचा दबाव येत असेल. त्याचे काय? त्याला प्रत्युत्तर म्हणून एक विद्यार्थीनी राहुल गांधी यांना विचारते, ’लग्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं?' या विद्यार्थीनीच्या उत्तर देत राहुल गांधी म्हणाले, ‘मी गेले २०-३० वर्ष हा लग्नाचा दबाव सहन करत आलोय. ही चांगली गोष्ट आहे….’ दरम्यान, आणखी एक विद्यार्थीनी राहुल गांधी यांना विचारते की तुमच्या लग्नाचा काय प्लॅन आहे? तर राहुल गांधी म्हणतात, ‘हो, हो... म्हणजे, मी त्याची योजना करत नाही. पण तसे झाले तर…’ तर लगेच दुसरी विद्यार्थीनी उत्तर देते, ‘ सर, तुम्ही लग्न केलं तर लग्नाला कृपया आम्हाला देखील आमंत्रित करा’.
राहुल गांधींसोबत बोलताना व्हिडिओमध्ये विद्यार्थीनींनी लग्नाच्या भीतीबद्दल आपलं मत व्यक्त केलं. ‘मी फक्त २१ वर्षांची आहे. आम्ही आमच्या कोर्ट डायरीसाठी विविध कोर्टात गेलो तेव्हा कळलं की काश्मीरमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. हे माझ्यासाठी थोडे भीतीदायक आहे’ असं एक विद्यार्थी म्हणाला.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काश्मीरी विद्यार्थीनींदरम्यान संवाद सुरू असताना कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या व्हिडिओ कॉलद्वारे त्या चर्चे सहभागी झाल्या होत्या.