"जेव्हा तुम्ही अदानींचे प्रकरण काढता तेव्हा पंतप्रधान.."; संसदेच्या विशेष अधिवेशनावर राहुल गांधींची प्रतिक्रिया
Rahul Gandhi on special session of parliament : संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या मनात कदाचित भीती असेल, म्हणून त्यांनी विशेष अधिवेशन बोलावले आहे.
मुंबई - केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले असताना मोदी सरकारकडून लगेचच विशेष अधिवेशन बोलवण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात ५ सत्र होणार आहेत. यामध्ये सहा विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. या विशेष अधिवेशनाबाबत राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
इंडिया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीसाठी राहुल गांधी मुंबईत आले आहेत. मुंबईत दाखल होताच त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा अदानी व मोदींवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या मनात कदाचित भीती असेल, म्हणून त्यांनी विशेष अधिवेशन बोलावले आहे.
केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावताच सरकारकडून एक देश, एक निवडणूक विधेयक आणले जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. यावर्षीच्या सुरुवातीला लॉ कमिशनने राजकीय पक्षांकडून ६ प्रश्नांची उत्तरे मागितली होती. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत. त्यामुळे, आता मोदी सरकारच्या विशेष अधिवेशनावरुन चर्चा होत आहे.
याबाबत राहुल गांधी म्हणाले की, कदाचित मोदींच्या मनात थोडीशी भीती असेल, त्याप्रकारची भीती जेव्हा मी संसेदत भाषण केल्यानंतर त्यांना वाटली होती. त्या भीतीमुळेच, माझी खासदारकी रद्द करण्यात आली. म्हणूनच, मला वाटते की ही भीतीची बाब आहे. कारण, हे सर्व प्रकरण पंतप्रधानांच्या जवळचे आहेत. जेव्हा तुम्ही अदानींचे प्रकरण काढता तेव्हा पंतप्रधान असह्य आणि घाबरतात, असे उत्तर राहुल गांधींनी संसदेच्या विशेष अधिवेशनासंदर्भात दिले.