मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : भाजपनं कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल केला; राहुल गांधी यांच्याकडून सणसणीत उत्तर

Rahul Gandhi : भाजपनं कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल केला; राहुल गांधी यांच्याकडून सणसणीत उत्तर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 06, 2024 05:20 PM IST

Rahul Gandhi on Viral Video feeding dog : कुत्र्याला बिस्किट देतानाच्या भाजपनं व्हायरल केलेल्या व्हिडिओवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खुलासा केला आहे.

Rahul Gandhi Explanation on his viral Video
Rahul Gandhi Explanation on his viral Video

Rahul Gandhi Viral Video feeding dog : भारत जोडो न्याय यात्रेत कुत्र्याला बिस्किट देतानाचा राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ भाजपनं व्हायरल केला आहे. राहुल गांधी हे कुत्र्याचं बिस्किट कार्यकर्त्याला देत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. हे आरोप फेटाळून लावताना राहुल यांनी भाजपला सणसणीत टोला हाणला आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा सध्या झारखंडमध्ये आहे. यात्रेदरम्यान त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. कुत्र्यानं न खाल्लेलं बिस्किट राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला खायला दिलं असं म्हणत भाजपनं एक व्हिडिओ व्हायरल केला आहे.

राहुल यांनी संबंधित व्हिडिओबद्दल बोलताना तो प्रसंग काय होता आणि तिथं नेमकं काय घडलं हे सांगितलं. ते म्हणाले, ‘भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान एक व्यक्ती मला भेटली. त्याच्यासोबत त्याचा कुत्रा होता. आमची चर्चा सुरू असताना तो कुत्रा गाडीच्या टपावर होता. मात्र गर्दीमुळं तो घाबरला होता. मी त्याला एक बिस्किट खायला दिलं, पण भीतीमुळं तो खात नव्हता. मग मी तेच बिस्किट त्याच्या मालकाच्या हातात दिलं. त्यानं ते कुत्र्याला खायला दिलं आणि कुत्र्यानं ते खाल्लं. त्यात एवढी चर्चा होण्यासारखं काय आहे?’

हे सगळं सांगून झाल्यावर राहुल यांनी भाजपला टोला हाणला. 'भाजपवाल्यांना कुत्र्यांचा एवढा काय प्रॉब्लेम आहे? कुत्र्यांनी त्यांचं काय बिघडवलंय,' असा खोचक सवाल राहुल गांधी यांनी केला. त्यावर एकच हंशा पिकला.

राजकीय पक्षांत 'व्हर्चुअल वॉर'

प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानातील प्रचारापेक्षा सोशल मीडियातील व्हर्चुअल हल्ले सध्या जनमानस तयार करण्यात महत्त्वाचे ठरत आहेत. राजकीय पक्षांनी हे ओळखल्यामुळं एकमेकांच्या चुका दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. भाजप यात खूपच आघाडीवर असतो. मात्र, हल्ली इतर पक्षांनीही या व्हर्चुअल युद्धाचा आधार घेतला आहे. राहुल गांधी यांचा व्हायरल झालेला ताजा व्हिडिओ हा त्याचाच भाग आहे. राहुल गांधी हे काँग्रेस कार्यकर्त्यांना किती क्षुल्लक समजतात हे दाखवण्याचा या व्हायरल व्हिडिओच्या मागील हेतू होता. मात्र, राहुल यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगून यातील हवा काढून घेतली आहे.

WhatsApp channel

विभाग