Rahul Gandhi On Narendra Modi : सूरतमधील कोर्टानं हेट स्पीच प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी हे अधिक आक्रमक झाले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. एसबीआय, एलआयसी आणि ईपीएफओचे पैसे अदानींच्या कंपन्यांमध्ये कसे काय गुंतवले जात आहेत?, असा सवाल करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळं आता यावरून काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटलं आहे की, एलआयसी, एसबीआय आणि ईपीएफओमधील पैसे गौतम अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवले जात आहे. या प्रकरणात मोदी सरकारनं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. तसेच कोणताही तपास अथवा चौकशी केली जात नाहीये. अशी कोणती भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत आहे?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. त्यासाठी राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीला हवाला दिला आहे. त्यामुळं आता गौतम अदानी प्रकरणावरून केंद्रातील मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ते २० हजार कोटी कुणाचे?- राहुल गांधी
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेले २० हजार कोटी रुपये कुणाचे आहेत?, असा सवाल पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी केला होता. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना आणि त्यांच्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी कारवाई करत सुटले आहे. अपात्रता, तुरुंगवास किंवा धमक्यांना घाबरणार नाही, मोदी सरकारने केलेले गैरव्यवहारांवर बोलतच राहणार असल्याचं राहुल गांधी म्हणालेत. गौतम अदानी यांचं पीएम नरेंद्र मोदी यांच्याशी काय नातं आहे?, हे त्यांनी सांगावं, असं आव्हानही राहुल गांधी यांनी पीएम मोदींना दिलं आहे.