Rahul Gandhi Latest news : ‘१०-१५ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं जातं, पण २ हजार कोटींचा घोटाळा करूनही गौतम अदानी सन्मानानं बाहेर फिरतात हे कसं काय? त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी’, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.
सौर ऊर्जेच्या कंत्राटांसाठी गौतम अदानी यांनी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेच्या वकिलांनी तिथल्या कोर्टात केला आहे. त्यावर देशात गदारोळ सुरू झाला आहे.
राजधानी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गौतम अदानी यांना घेरलं. 'अदानी यांनी अमेरिकन आणि भारतीय कायदा या दोन्ही मोडल्याचं आता अमेरिकेत स्पष्ट झालं आहे. त्यांच्यावर अमेरिकेत आरोप झाले आहेत. तरीही आपल्या देशात ते अजून खुलेपणानं फिरत आहेत. त्यांना आजच अटक झाली पाहिजे. अदानींना वाचवणाऱ्या माधबी पुरी बुच यांची सेबीच्या प्रमुखपदावरून हकालपट्टी करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही राहुल यांनी केली.
'अदानी ग्रुपकडून होत असलेल्या घोटाळ्याचा मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित करत आलो आहेत. संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. माधबी बुच यांच्या मुद्द्यावरही आम्ही बोललो आहोत. अमेरिकेनं आता त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. अदानी भारतात घोटाळे करत आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानींना वाचवत आहेत. पंतप्रधान स्वत: अदानी यांच्यासोबत भ्रष्टाचारात गुंतले आहेत, असा आरोप त्यांनी केला. अदानींनी संपूर्ण देश हायजॅक केला आहे, असा दावाही त्यांनी केला.
'भारतात अदानींवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. १० ते १५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना तुरुंगवास भोगावा लागला, पण दोन हजार कोटींचा घोटाळा करणारे गौतम अदानी मोकळे आहेत. याचं कारण अदानी हे थेट भाजपशी संबंधित आहेत. हे संबंध आर्थिक आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानींना वाचवत आहेत. मोदी त्यांना अटक करू शकत नाहीत. ती हिंमत त्यांच्यात नाही. कारण, अदानींना अटक केल्यास स्वत: मोदी अडकणार आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गौतम अदानी यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.