Rahul Gandhi interaction with Indian Youth congress : ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांना केवळ सत्ता हवी आहे. सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकता. मणिपूर जाळू शकतात. उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब संपूर्ण देश जाळू शकतात,’ अशी जळजळीत टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली.
भारतीय युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे संबोधित करताना ते बोलत होते. देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
'मणिपूरमध्ये काय झालं आणि काय होतंय हे सर्वांना माहीत आहे. आपल्या पंतप्रधानांनी मणिपूरबद्दल एक शब्द उच्चारलेला नाही. देशातील एक राज्य हिंसाचाराते जळतंय. त्यामुळं पंतप्रधान काही बोलतील असं कोणालाही वाटणं साहजिक आहे. विमानानं जाऊन किमान इम्फाळमध्ये लोकांशी बोलतील, पण तसं काहीही झालेलं नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसचे पंतप्रधान असते तर त्यांनी मणिपूरमध्ये ठाण मांडलं असतं, असं राहुल गांधी म्हणाले.
'नरेंद्र मोदी मणिपूरवर बोलत नाहीत, बोलणार नाहीत. कारण, मोदी हे निवडक लोकांचे, आरएसएसचे पंतप्रधान आहेत. त्यांना मणिपूरशी काही घेणंदेणं नाही. त्यांना माहीत आहे. त्यांच्याच विचारधारेनं मणिपूर पेटवलंय. मणिपूरवासीयांच्या, तिथल्या महिलांच्या वेदनांनी मोदींना काडीचा फरक पडत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
'सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात. मणिपूर जाळतील. पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणा संपूर्ण देश जाळतील. त्यांना फक्त सत्ता हवी. त्यांना देशाचं दु:ख, वेदनेशी काहीही घेणंदेणं नाही. आपली लढाई ह्याच विचारधारेशी आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीला दु:ख झालं, मग तो कोणतीही भाषा बोलणारा असेल, कुठल्याही राज्याचा असेल तर काँग्रेसच्या व्यक्तीला नकळत वेदना होतात. आरएसएस, भाजपला त्याचं काहीही वाटणार नाही. देश फोडायचं काम हे लोक करत आहे. पिढ्यान् पिढ्या करत आलेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
भारत जोडो यात्रेत खूप चांगली घोषणा दिली गेली. द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान सुरू करायचं आहे. हेच काँग्रेसचं काम आहे. बाकी कोही बोलायची गरज नाही. मणिपूरमध्ये त्यांनी द्वेषाचा बाजार मांडलाय, आपल्याला तिथं प्रेमाचं दुकान सुरू करायचं आहे. जिथं कुठं हे द्वेष पसरवतील, तिथं आपल्याला प्रेमाचं दुकान सुरू करायचं आहे, असं आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केलं.