Rahul Gandhi on Om Birla : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या विरोधात देशभरात रान उठवणारे राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर अधिकच आक्रमक झाले आहेत. लोकसभेत आज बोलताना त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह सत्ताधारी मंत्र्यांवरही निशाणा साधला.
'लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन करतात, तेव्हा वाकतात, पण मला भेटतात तेव्हा छाती पुढं करून येतात, असा टोला राहुल गांधी यांनी हाणला. लोकसभा अध्यक्ष हा निःपक्षपाती असावा, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही निशाणा साधला. 'राजनाथ सिंह मला सकाळी भेटले होते. ते हसून माझ्याशी बोलले, माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आता सभागृहात बसल्यावर ते गंभीर आहेत. कारण नरेंद्र मोदींसमोर ते माझ्याशी बोलायला घाबरतात. नितीन गडकरींचीही तीच अवस्था आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
ओम बिर्ला यांनी राहुल यांच्या टीकेला उत्तर दिलं. मोठ्यांसमोर नतमस्तक होऊन बोलावं. गरज पडल्यास त्यांच्या पायाला स्पर्श करून आदर व्यक्त करावा, असं माझे संस्कार सांगतात. पंतप्रधान हे सभागृहाचे नेते आहेत, असं बिर्ला म्हणाले. 'समान वयाच्या लोकांना समान वागणूक द्यावी, असंही मी शिकलोय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सभापती ओम बिर्ला यांच्या उत्तरावरही राहुल गांधी गप्प बसले नाहीत. त्यांनी आपली तीच भूमिका पुढं मांडली. 'पंतप्रधान मोठे असले तरी तुम्ही लोकसभेचे अध्यक्ष आहात. मी आणि संर्व विरोधक तुमच्यापुढं नतमस्तक होण्यास तयार आहोत, याची आठवण राहुल यांनी दिली.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सरकारनं सर्वत्र भीतीचं वातावरण करून ठेवलं आहे. कोणताही धर्म हिंसा शिकवत नाही. मात्र, स्वत:ला रोज हिंसेचा जप करतात आणि द्वेष पसरवतात. भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही आणि भाजपवाले तर हिंदू असूच शकत नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल यांच्या या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. कोणत्याही समाजाला हिंसक म्हणणं योग्य नाही, असं मोदी म्हणाले, तर, राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
संबंधित बातम्या