Puthuppally Results 2023 : केरळमध्ये काँग्रेसचा गड अभेद्य, डाव्यांची झुंज अपयशी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Puthuppally Results 2023 : केरळमध्ये काँग्रेसचा गड अभेद्य, डाव्यांची झुंज अपयशी

Puthuppally Results 2023 : केरळमध्ये काँग्रेसचा गड अभेद्य, डाव्यांची झुंज अपयशी

Sep 08, 2023 02:24 PM IST

Kerala Puthuppally election Results 2023 : केरळमधील पुथुपल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव केला आहे.

Kerala Bypoll
Kerala Bypoll

Puthuppally election Results 2023 : केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधातील इंडिया आघाडीमध्ये एकत्र असलेल्या, पण केरळमध्ये कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील लढाईत काँग्रेसनं बाजी मारली आहे. कोट्टायम जिल्ह्यातील पुथुपल्ली पोटनिवडणुकीत काँग्रेस चंडी ओमेन यांनी माकपचे जॅक सी थॉमस यांचा पराभव केला आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते ओमेन चंडी यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या पुथुपल्ली इथं ५ सप्टेंबर रोजी मतदान झालं होतं. केरळचं मुख्यमंत्रिपद दोनदा भूषवणाऱ्या चंडी यांनी १९७० पासून हा मतदारसंघ ताब्यात ठेवला होता. राज्यातील सत्ताधारी माकपनं या पोटनिवडणुकीत काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या समोर आव्हान उभं केलं होतं.

माकपनं पक्षाच्या युवा आघाडीचे नेते जॅक सी थॉमस यांना मैदानात उतरवलं होतं. थॉमस यांनी याआधी २०१६ व २०२१ मध्ये चंडी यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता चंडी यांच्या निधनानंतर ही जागा ताब्यात घेण्याचा माकपचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी थॉमस यांच्यावरच विश्वास टाकला होता. मात्र, त्यांना फार काही करता आलं नाही. केरळमध्ये जनाधार नसलेल्या भाजपनं यावेळी पुन्हा एकदा लिगिन लाल यांना रिंगणात उतरवलं होतं. २०२१ साली लाल यांना याच मतदारसंघात १० टक्क्यांपेक्षाही कमी मतं मिळाली होती.

मागील वर्षी राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत चंडी ओमेन यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ओमेन चंडी यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असल्यानं चंडी यांना काँग्रेसनं तिकीट दिलं होतं. त्यांनी अपेक्षेप्रमाणं हा गड राखला. त्यांनी थॉमस यांचा ३६ हजारहून अधिक मतांनी पराभव केला. चंडी यांना ७८,६४९ मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी थॉमस यांना ४१,९८२ मतं मिळाली.

पुथुपल्लीतील निकालाचा राज्यातील सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. केरळच्या १४० सदस्यांच्या विधानसभेत डावी आघाडी ९९ जागांसह सत्तेत आहे. असं असलं तरी या निवडणुकीनं देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर