मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रिक्षाचालकाने केली डीएसपीची गोळ्या झाडून हत्या; ४८ तासांत पोलिसांनी केला हत्येचा उलगडा

रिक्षाचालकाने केली डीएसपीची गोळ्या झाडून हत्या; ४८ तासांत पोलिसांनी केला हत्येचा उलगडा

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Jan 04, 2024 07:33 PM IST

पंजाब पोलीस दलात पोलीस उपअधिक्षक म्हणून कार्यरत दलबीर सिंग देओल या अधिकाऱ्याच्या हत्येचा उलगडा झाला असून एका रिक्षाचालकाने गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

DSP Dalbir Singh Deol (File)
DSP Dalbir Singh Deol (File) (HT_PRINT)

पंजाबच्या जालंधर शहरामध्ये मृतावस्थेत आढळलेले पंजाब पोलील दलातील पोलीस उपअधीक्षक दलबीर सिंग देओल यांच्या हत्येचा उलगडा झाला असून एका रिक्षाचालकाने त्यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. देओल यांनी या रिक्षाचालकाला त्यांच्या गावी सोडण्यास सांगितले होते. परंतु रिक्षाचालकाने घेऊन जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर देओल यांची रिक्षाचालकासोबत बाचाबाची होऊन झटापट झाली होती. या झटापटीदरम्यान रिक्षाचालकाने देओल यांच्या कमरेला लटकलेली सर्विस रिव्हॉल्वर हिसकावून त्यांच्यावरच गोळ्या झाडल्या होत्या. आरोपी रिक्षाचालकाचं नाव विजय कुमार असं असून गुन्ह्याच्या वेळी त्याने ड्रगचे सेवन केले होते, असं तपासात निष्पन्न झालं आहे. 

डीएसपी देओल यांचा मृतदेह जालंधरजवळ बावा खेल गावात रस्त्यावर पडलेला आढळला होता. त्यांचा एक पाय कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाच्या डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या. त्यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावापासून आठ किलोमीटर अंतरावर सापडला. वेटलिफ्टरचे खेळाडु असलेले देओल यांना २००० मध्ये क्रीडा क्षेत्रातला ‘अर्जुन पुरस्कार’ मिळाला होता.

या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना जालंधरचे पोलिस आयुक्त स्वप्न शर्मा म्हणाले, ‘पोलीस उपअधिक्षक देओल यांनी रिक्षाचालकाला त्यांच्या गावी सोडण्याचे सांगितले होते. परंतु रिक्षाचालकाने नकार दिल्याने दोघांमध्ये भांडण झालं. भांडणानंतर झटापट झाली. यादरम्यान रिक्षाचालकाने देओल यांच्या कमरेला लटकलेले सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून घेतले आणि त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे.’ असं शर्मा यांनी सांगितले.

या मृत्युप्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याची माहिती जालंधरचे उपायुक्त डीसीपी बलविंदर सिंग रंधावा यांनी दिली. 

WhatsApp channel

विभाग