Bhagwant Mann on AAP performance in Gujarat : गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २४ तास उलटले तरी निकालाचे कवित्व सुरूच आहे. विजयी पक्ष जल्लोषात रमलेले असताना विजयाचे दावे करणारे, पण पराभूत झालेले पक्ष आपल्या कामगिरीचं समर्थन करताना दिसत आहेत. पंजाबचे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तर पक्षाच्या पराभवाचा संबंध थेट भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीशी जोडला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं निर्विवाद विजय मिळवला. मात्र, भाजप इतका मोठा विजय मिळवेल असं निकाल लागेपर्यंत कोणालाही वाटलं नव्हतं. कारण, आम आदमी पक्षानं गुजरातमध्ये प्रचाराची अक्षरश: राळ उडवून दिली होती. गुजरातमध्ये आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार असा दावाच केजरीवाल यांनी केला होता. भाजपचा पराभव होणार हे लिहून घ्या, अशी भाषाही केजरीवाल यांनी केली होती. मात्र, त्यांचे सगळे दावे फोल ठरले. आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये केवळ पाच जागा जिंकता आल्या. इतर अनेक जागांवर त्यांच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. मात्र, 'आप'चे नेते पक्षाच्या कामगिरीकडं बोट दाखवून यश मिळाल्याचं सांगत आहेत.
भगवंत मान यांनीही 'आप'चा पराभव झाल्याचं मान्य करण्यास नकार दिला आहे. 'मागच्या निवडणुकीत गुजरातमध्ये आम्हाला एकही जागा मिळाली नव्हती. आम्ही शून्यातून पाचवर आलो आहोत. त्यामुळं आमचा पराभव झाला असं म्हणता येणार नाही. विराट कोहली सुद्धा प्रत्येक सामन्यात शतक ठोकत नाही,' असं भगवंत मान म्हणाले.
एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गुजरातमध्ये 'आप'ला १३ टक्के मतं मिळाली आहेत याकडं मान यांनी लक्ष वेधलं. केजरीवाल यांच्याकडं किमान लेखी देण्याची हिंमत आहे. 'आम्ही काँग्रेससारखं मैदान सोडत नाही, मेहनत करतो. पंजाबमधून आता आम्ही गुजरातमध्ये प्रवेश केला आहे. आता आमचा पक्ष राष्ट्रीय झाला आहे, असं ते म्हणाले.
आमच्या पक्षाचा जन्म भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून झाला आहे. हा पक्ष अन्य पक्षातून बाहेर पडलेल्या व्यक्तीनं स्थापन केलेला नाही. देशसेवा करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांना पक्षानं एक मार्ग दाखवला आहे. दिल्ली महापालिकेत 'आप'नं भाजपची १५ वर्षांची राजवट उलथवून टाकली आहे. जेव्हा लोक स्वत: तुमच्यासाठी लढतात, तेव्हा तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही,' असं मान म्हणाले.