Punjab Bandh : विविध मागण्यांसाठी पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक शहरातील दुकाने, बाजार बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. चंदीगडसारख्या शहरात फारसा परिणाम झाला नसला तरी जालंधर, लुधियाना, पठाणकोट, मोहाली, होशियारपूर, बठिंडा सारख्या भागात बाजारपेठा बंद होत्या. रस्ते व रेल्वे स्थानकावर देखील शुकशुकाट पाहायला मिळाला.
रेल्वेने खबरदारी म्हणून सोमवारी पंजाबला ये-जा करणाऱ्या एकूण २२१ गाड्या रद्द केल्या आहेत. यातील अनेक गाड्या जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशसाठीही चालवल्या जातात. त्याचबरोबर जम्मूतवीहून यूपी, बिहारसह देशातील अनेक राज्यांमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. शताब्दी एक्स्प्रेस, वंदे भारत सारख्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
पंजाबमध्ये केवळ आपत्कालीन सेवा सुरू असून दुपार चारनंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी दुपारी चार वाजेपर्यंत बंदची घोषणा केली आहे. खासगी बसचालकांनीही संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रस्त्यांवर वर्दळ आहेत. अनेक गाड्या रद्द केल्याने रेल्वे स्थानकांवरही शांतता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. दल्लेवाल यांनी सरकार कडे विविध मागण्या केल्या आहेत. यात सरकारने एमएसपी कायदा आणावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. हा कायदा जो पर्यंत लागू होत नाही तो पर्यंत ते उपोषण सुरूच ठेवणार आहेत. सुप्रीम कोर्टाने पंजाब सरकारला डल्लेवाल यांच्यावर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
डल्लेवाल यांच्या उपोषणाला एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. शंभू सीमेवर शेतकरी जमले असून हे शेतकरी दिल्लीत जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांना सीमेवरच रोखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे डल्लेवाल यांनी उपोषण सुरू केले आहे. बंदमुळे पंजाबमधील बहुतांश राष्ट्रीय महामार्गांवर वर्दळ कमी आहे. अनेकांनी आज घरूनच काम करण्यास प्राधान्य दिले आहे. दिल्ली, चंदीगड, हरयाणा आदी ठिकाणांहून हिमाचल आणि जम्मू-काश्मीरकडे जाणारी खासगी वाहने ही महामार्गावरच उभी करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी पहाटेच बाहेर पडले असून त्यांनी अनेक दुकाने बंद करण्यास भाग पाडले आहेत. पंजाबच्या ग्रामीण भागात बंदचा परिणाम सर्वाधिक दिसून येत आहे. फिरोजपूर, बठिंडा, होशियारपूर, मोगा, पतियाळा या जिल्ह्यांमध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
पंजाबमध्ये आज अनेक सरकारी कार्यालये व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत दल्लेवाल यांच्या उपोषणाचा आज ३५ वा दिवस आहे. पंजाबचे माजी पोलिस अधिकारी जसकरण सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी सायंकाळी डल्लेवाल यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने डल्लेवाल यांना उपोषण तोडण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना अपयश आले. शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर यांच्या नेतृत्वाखाली या बंदचे नेतृत्व करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनाला हरयाणातील खाप पंचायतींचाही पाठिंबा मिळाला आहे.
संबंधित बातम्या