Army Day parade in Pune : भारतीय लष्कराचा स्थापना दिवस साजरा करण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुण्यात १५ जानेवारी २०२५ रोजी आर्मी डे समारंभ आयोजित केला जाणार आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे या समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. या सोहळ्याच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या माध्यमातून लष्कराचा गौरवशाली इतिहास उलगडणार आहे. या पूर्वी हा सोहळा फक्त दिल्लीत आयोजित करण्यात येत होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा सोहळा दिल्ली बाहेर होत असून पुढील वर्षी पुण्यात हा सोहळा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
भारतीय लष्कराची स्थापना ही १५ जानेवारी १९४९ रोजी झाली होती. या दिवशी फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून १५ जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो. १९४९ मध्ये ब्रिटीश जनरल सर रॉय बुचर यांच्यानंतर करीअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे हाती घेतली. त्याच वर्षी आर्मी डे साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
आर्मी डे पुण्यात कोठे होणार या साठी दक्षिण मुख्यालयाचे अधिकारी चाचपणी करत आहेत. पुण्यातील नेमके ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र, आर्मी डे परेड ही खडकी येथील बॉम्बे सॅपर्स (बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि सेंटर) येथे होऊ शकते. या बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने लष्कर दिन, नौदल दिन आणि वायुसेना दिन दिल्ली बाहेर आयोजित करण्याचा नवा पायंडा पडला आहे. त्यामागे अधिकाधिक लोकसहभागाला प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे व देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये लष्कराचे सामर्थ्य आणि शिस्त प्रदर्शित करणे हा यामागचा उद्देश आहे.
२०२३ मध्ये आर्मी डे परेड बेंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम राजधानीबाहेर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. २०२४ मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आर्मी डे परेड आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आता २०२५ मध्ये आर्मी डे परेड पुण्यात आयोजित केली जाणार आहे.
पुण्यात १५ जानेवारी २०२५ रोजी आर्मी डे परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. यात लष्कराचे संचलन हा कार्यक्रम या सोहळ्याचं खास आकर्षण राहणार आहे. या सोबतच चित्त थरारक कवायती, शस्त्रास्त्र प्रदर्शन, हवाई कसरती, आधुनिक शस्त्र प्रणाली प्रदर्शन, प्रत्यक्ष युद्धाचे प्रात्यक्षिकं आदि कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. आर्मी डे च्या पाच ते सहा दिवसाआधी या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तर १५ जानेवारीला या सोहळ्याची सांगता होईल.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. या सोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.