Pune Porsche accident : 'आमची मुलगी तर निघून गेली, तिला असं बदनाम करू नका', मृत्यू झालेल्या अश्विनीची आई संतापली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pune Porsche accident : 'आमची मुलगी तर निघून गेली, तिला असं बदनाम करू नका', मृत्यू झालेल्या अश्विनीची आई संतापली

Pune Porsche accident : 'आमची मुलगी तर निघून गेली, तिला असं बदनाम करू नका', मृत्यू झालेल्या अश्विनीची आई संतापली

May 22, 2024 07:03 PM IST

Pune Porsche Accident : अश्विनीच्या आई-वडिलांनी माध्यमांना विनंती केली की, त्यांनी अश्विनीची बदनामी करू नये. अश्विनी आणि अनिश या मृत्यू झालेल्या दोघांना कपल म्हणण्यावर त्यांनी आक्षेप घेतले आहेत.

अश्विनीची आई म्हणाली माझ्या मुलीची बदनामी करू नये
अश्विनीची आई म्हणाली माझ्या मुलीची बदनामी करू नये

पुण्यातील कल्याणीनगर येथे एका श्रीमंताच्या अल्पवयीन मुलाने भरधाव अलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवले. यात अश्विनी कोष्टा (Ashwini costa) आणि तिचा मित्र अनिश अवधिया यांना जीव गमवावा लागला आहे. अल्पवयीन आरोपीने १२ वीची परीक्षा दिली होती व दारूच्या नशेत कार चालवत होता. त्याने रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लग्जरी पॉर्श कार २०० किमी गतीने चालवून एका मोटारसायकलस्वाला धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की, अश्विनी २० फूट वरती उडूनरस्त्यावर आपटली. अनिशचाही जागीच मृत्यू झाला. त्यानंतर लोकांनी आरोपीला कारच्या बाहेर ओढून त्याची चांगलीच धुलाई केली.

अश्विनीवर अपघाताच्या ५० तासांनंतर जबलपूरच्या गौरीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अश्विनीच्या आई-वडिलांनी माध्यमांना विनंती केली की, त्यांनी अश्विनीची बदनामी करू नये. अश्विनी आणि अनिश या मृत्यू झालेल्या दोघांना कपल म्हणण्यावर त्यांनी आक्षेप घेतले आहेत. एकाच संस्थेत काम करणारे सगळी मुलं-मुली कपल नसतात,आमची मुलगी तर निघून गेली आहे,पण मीडियाने अशाप्रकारचे शब्दप्रयोग करून त्यांची बदनामी करू नये,असं आवाहन अश्विनीच्या आईने केलं आहे.

अश्विनीच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. आपली मुलगी आता या जगात नाही,यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नाहीये. अश्विनीचं पार्थिव २० मे रोजी रात्री पुण्याहून जबलपूरला आणण्यात आलं. कुटुंबामध्ये सगळ्यात लहान असल्यामुळे घरात अश्विनीवर सगळ्यांचं जास्तच प्रेम होतं. अश्विनीच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंब टाहो फोडून रडायला लागला.

अश्विनी कोस्टा जबलपूरमधील महर्षि विद्या मंदिर शाळेची माजी विद्यार्थिनी होती. त्यानंतर तिने वाडिया महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. ती जबलपूरच्या साकार हिल्स कॉलनीमध्ये रहात होती. तिचे वडील सुरेश कुमार कोष्टा वीज विभागात कार्यालय सहायक पदावर काम करतात. अश्विनी मागील २ वर्षांपासून पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. अश्विनी अॅमेझॉन या मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होती. एक वर्षापूर्वी तिने नोकरी बदलून जॉनसन कंपनी ज्वाईन केली होती. यामध्ये ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला होती.१९मे च्या रात्री अश्विनी तिचा सहकारी अनिश अवधियासोबत मित्राची वाढदिवसाची पार्टी करून घरी जात असताना भरधाव कारने तिला ठोकरले. यात अश्विनी आणि अनिशचा जागीच मृत्यू झाला.

कुटूंबीयांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिने घरी येऊन तिचा वाढदिवस साजरा केला होता. घरात सर्वात लहान असल्यानं ती सर्वांची लाडकी होती. अश्विनीच्या भावाने म्हटलं की,आता बहीण या जगात राहिली नाही,पण दोषींवर कठोर कारवाई करावी. अश्विनी आणि अनिश एकाच कंपनीत काम करत होते. दोघेही पार्टीनंतर दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर