Rizwal Ali : पुणे आयसिस मॉड्युलशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवान अलीला दिल्लीत अटक-pune isis module linked terrorist rizwan abdul ali arrested by delhi police ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rizwal Ali : पुणे आयसिस मॉड्युलशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवान अलीला दिल्लीत अटक

Rizwal Ali : पुणे आयसिस मॉड्युलशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवान अलीला दिल्लीत अटक

Aug 09, 2024 02:04 PM IST

NIA arreste ISIS terrorist : दिल्ली पोलिस व एनआयएच्या पथकाने दिल्लीतील गंगा बख्श मार्गावरील जैवविविधता उद्यानाजवळ इस्लामिक स्टेटच्या पुणे मॉड्यूलशी संबंधित दहशतवाद्याला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली.

पुणे आयसिस मॉड्यूलशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवानला दिल्लीत अटक, NIA ने ठेवलं होतं ३ लाखांचं बक्षीस
पुणे आयसिस मॉड्यूलशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवानला दिल्लीत अटक, NIA ने ठेवलं होतं ३ लाखांचं बक्षीस

NIA arreste ISIS terrorist : दिल्ली पोलिस व एनआयएच्या पथकाने दिल्लीतील गंगा बख्श मार्गावरील जैवविविधता उद्यानाजवळ इस्लामिक स्टेटच्या पुणे मॉड्यूलशी संबंधित दहशतवाद्याला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. रिझवान अब्दुल हाजी अली (वय ३५) असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याच्याकडे काडतुसांसह एक अत्याधुनिक पिस्तूल देखील सापडले आहे.

पुणे पोलिसांच्या तावडीतून झाला होता फरार 

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला दहशतवादी रिजवान अली हा दिल्लीतील दर्यागंज भागात राहत होता. पुणे ईसीस मॉड्यूलचा मुख्य सूत्रधार तो आहे. गेल्या वर्षी जुलै २०२३ मध्ये पुणे पोलिसांच्या तावडीतून तो फरार झाला होता. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए)सह देशातील सर्व यंत्रणा त्याचा शोध घेत होते. तो एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत होता. व त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या आठवडाभरापूर्वी गुरुवारी ही अटक करण्यात आल्याने मोठा घातपात टळला आहे.

एनआयए व पुणे पोलिसांनी मार्च महिन्यात इसिस मॉड्यूल प्रकरणी पुण्यातील चार मालमत्ता जप्त केल्या होत्या. पुण्यातील कोंढवा येथे असलेल्या या मालमत्तांचा संबंध ११ आरोपींशी असून, तीन जण फरार आहेत. बॉम्ब तयार करणे, प्रशिक्षण देणे आणि दहशतवादी कारवायांची योजना आखण्यासाठी या मालमत्तांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, मोहम्मद शाहनवाज आलम आदींचा समावेश आहे. रिझवानने महाराष्ट्र, गुजरात आणि भारताच्या इतर भागात दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करणयाचे प्रशिक्षण दिले होते. तसेच दहशतवादी निधी गोळा करण्यासह घातपात करणारण्याच्या इसिसच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचा दावा एनआयएने केला आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये एनआयएने महाराष्ट्र इसिस दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात सहा आरोपींविरोधात आरोप दाखल केले होते. देशात विघातक कारवाया आणि इसिसची विचारधारा पसरवणाऱ्या नेटवर्कसह मोठे षडयंत्र पुणे पोलिसांनी उघडकीस आणले होते. आरोपींना मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात मुंबईतील ताबिश नासिर सिद्दीकी, बोरिवली-पडघा येथील झुल्फिकार अली बडोदावाला ऊर्फ लालाभाई, शरजील शेख आणि आकिफ अतीक नाचन आणि पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख ऊर्फ अबू नुसैबा आणि अदनाली सरकार यांचा समावेश आहे.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व जण प्रतिबंधित इसिस संघटनेचे सदस्य आहेत. यांनी देशात विविध भागात दहशतवादी कारवाया करण्याचा कट आखला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली पोलिसांनी एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये असलेल्या मोहम्मद शाहनवाजसह इसिसच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणा'शी संबंधित असल्याच्या आरोपावरून एनआयएने गेल्या वर्षी १२ सप्टेंबर रोजी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, तो २०१८ मध्ये दिल्ली पोलिसांच्या 'कट्टरतानिर्मूलन कार्यक्रमा'त सहभागी झाला होता. तेव्हा गुप्तचर यंत्रणा आणि विशेष कक्षाने त्याची निवड केली होती. पण त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते.

रिझवानवर एनआयएने ठेवले होते ३ लाखांचे बक्षीस

'पुणे इसिस मॉड्यूल' प्रकरणात दिल्लीतील मोहम्मद शाहनवाज शफिउज्जमा आलम ऊर्फ शफी ऊर्फ अब्दुल्ला, पुण्यातील तल्हा लियाकत खान, रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला या चार संशयितांची माहिती देणाऱ्यास एनआयएने प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

रिझवानकडून आधुनिक पिस्तूल जप्त

विशेष शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रमोदसिंह कुशवाह यांनी सांगितले की, त्यांना आरोपीच्या दिल्लीतील ठावठिकाणाची माहिती माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. पोलिस आणि एनआयएचे पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ३० बोरचे एक स्टार पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. रिझवान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.