Priyanka Gandhi Attacks Narendra Modi : लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून गेलेल्या काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी आज संसदेत पहिलं भाषण केलं. संविधानावरील चर्चेची सुरुवातच त्यांच्या भाषणानं झाली. यावेळी प्रियांका गांधी यांनी पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्या राजवटीसह आताच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ‘भारत देश भित्र्यांच्या हाती फार काळ राहिलेला नाही आणि राहणार नाही,’ असा जहरी टोला त्यांनी मोदी सरकारला हाणला.
'देशातील सध्याचं वातावरण भयाचं आहे. स्वातंत्र्यापासून अनेक वर्षे देशातील चर्चा कधीही बंद झाली नव्हती. वादचर्चा सुरू असत. पण आज ते सगळं बंद करण्यात आलं आहे. पत्रकार, विरोधक, विद्यापीठांचे प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या संघटना सगळ्यांची तोंडं बंद केली जात आहे. खोटे गुन्हे दाखल केले जातात. ईडी, सीबीआयचा वापर केला जातोय. देशद्रोह्याचं लेबल लावलं जातं. देशातील सगळं वातावरण बिघडवून टाकलंय. सत्ताधाऱ्यांची मीडिया मशिन खोट्या गोष्टी पसरवते, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला.
'देशात सध्या जे भीतीचं वातावरण आहे, तसं वातावरण फक्त इंग्रजांच्या काळात होतं. तेव्हा एका बाजूला गांधीवादी लोक स्वातंत्र्याची लढाई लढत होते आणि भेकड लोक इंग्रजांशी मिलिभगत करण्यात गुंतले होते. मात्र भीती पसरवणारे स्वत: घाबरट असतात. ते स्वत: घाबरतात. चर्चेला, टीकेला घाबरतात. आम्ही इतक्या दिवसांपासून चर्चेची मागणी करतोय, पण यांच्यात चर्चा करण्याचीही हिंमत नाही, असा टोला प्रियांका यांनी हाणला.
प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागताना प्राचीन काळच्या एका राजाची गोष्ट सांगितली. तो राजा लोकांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी वेष बदलून राज्यात फिरायचा. आजच्या राजाला वेष बदलण्याचा शौक आहे खरा, पण त्याच्यात टीका ऐकण्याची हिंमत नाही. लोकांमध्ये जाण्याचं धाडस नाही, अशी सणसणीत टीका प्रियांका गांधी यांनी मोदींवर केली.
‘भयाची सुद्धा एक मर्यादा असते. तुम्ही कोणाला सदासर्वकाळ घाबरवून ठेवू शकत नाही. जेव्हा गमावण्यासारखं काहीच राहत नाही तेव्हा तो उसळून उठतो. अशा व्यक्तीसमोर भेकड उभा राहू शकत नाही. हा देश भेकड लोकांच्या हाती फार काळ राहिलेला नाही. हा देश पुन्हा उठेल आणि सत्यासाठी लढेल,’ असा आशावाद प्रियांका यांनी व्यक्त केला.
‘जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळावरही भाष्य केलं. काही लोक नाव न घेता ज्यांच्याबद्दल बोलतात त्यांनीच देशाला सगळ्या PSU दिल्यात. धरणांपासून महाविद्यालयांपर्यंत सर्व काही त्यांच्याच कार्यकाळात झालं. आज सत्तेत असलेले लोक सतत भूतकाळाबद्दल बोलतात. नेहरूजींनी काय केलं? अहो, वर्तमानाबद्दल बोला. सगळं काही नेहरूंवर ढकलण्यापेक्षा तुमची काय जबाबदारी आहे हे देखील देशाला सांगा, असा बोचरा टोला प्रियांका यांनी मोदींना हाणला.
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादण्याची चूक केली हे प्रियांका यांनी मान्य केलं. मात्र, आज १९७५ च्या आणीबाणीबद्दल बोलणारे त्यातून शिकत नाहीत. आजच्या सत्ताधाऱ्यांनी शिकलं पाहिजे. तुम्ही फक्त बॅलेट पेपरचा वापर करून निवडणुका घ्या. सगळं काही स्पष्ट होईल, असं आवाहनही त्यांनी केलं.
'आर्थिकदृष्ट्या आज सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं जात आहे. अदानी यांना हिमाचलमधील सफरचंदांच्या व्यवसायातही प्रवेश देण्यात आला आहे. कोल्ड स्टोरेज त्यांच्या हातात आहे. एकाच माणसाला कसं वाचवलं जातंय ते अवघा देश पाहतोय. सर्व विमानतळं, खाणी, बंदरं, कंपन्या एकाच माणसाला दिल्या जात आहेत. हे सरकार केवळ अदानींसाठी चालत असल्याचा समज आज सर्वसामान्यांमध्ये निर्माण होत आहे, असंही त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या