पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांत चार राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २९ आणि ३० मे रोजी ते सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. यावेळी ते हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील आणि जाहीर सभांना संबोधित करतील. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार राज्यांचा दौरा २९ मे रोजी सकाळी ११ वाजता सिक्कीम येथून सुरू होईल.
आसामच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित 'Sikkim@50' कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. ७५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, सांगचोलिंग (पेलिंग) येथे प्रवासी रोपवे आणि गंगटोकमधील अटल अमृत उद्यानातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यासह राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्याच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ते स्मारक नाणे, स्मारक तिकिट आणि स्मृतिचिन्हाचे ही प्रकाशन करतील.
त्यानंतर दुपारी सव्वादोन वाजता पंतप्रधान पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे सिटी गॅस वितरण (सीजीडी) प्रकल्पाची पायाभरणी करतील. १०१० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाद्वारे अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यातील २.५ लाखांहून अधिक घरांना पाईपगॅस कनेक्शन आणि १०० हून अधिक व्यावसायिक युनिट्स आणि १९ सीएनजी स्टेशनद्वारे वाहनांना स्वच्छ इंधन प्रदान केले जाईल.
बिहारमधील पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ५.४५ वाजता पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. १२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या टर्मिनलची क्षमता वर्षाला एक कोटी प्रवाशांना हाताळण्याची असेल. १४१० कोटी रुपये खर्चाच्या बिहटा विमानतळाच्या नवीन सिव्हिल एन्क्लेव्हचे भूमिपूजनही ते करणार आहेत.
३० मे रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान बिहारमधील काराकत मध्ये ४८५२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये औरंगाबादमधील नबीनगर येथील २९ हजार ९३० कोटी रुपयांचा सुपर थर्मल पॉवर प्रकल्प, पाटणा-आरा-सासाराम आणि वाराणसी-रांची-कोलकाता महामार्ग यांसारखे महत्त्वाचे रस्ते प्रकल्प, गंगेवरील नवीन पूल आणि सोन नगर-महंमदगंज दरम्यान तिसरा रेल्वे मार्ग यांचा समावेश आहे.
पंतप्रधान ३० मे रोजी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी कानपूरला पोहोचतील. ते २०९०० कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये चुनीगंज ते कानपूर सेंट्रल पर्यंत मेट्रो रेल्वे प्रकल्प, पनकी औष्णिक विद्युत विस्तार प्रकल्प (६६० मेगावॅट), घाटमपूर औष्णिक विद्युत प्रकल्पाचे तीन युनिट आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधान ४० एमएलडी ट्रीटमेंट प्लांट, रेल्वे ओव्हरब्रिज आणि वीज प्रकल्पांचे ही उद्घाटन करतील. पंतप्रधान आयुष्मान योजना, आजीविका मिशन आणि पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि धनादेशांचे वितरणही त्यांच्या हस्ते होणार आहे.
संबंधित बातम्या