PM Modi in US : अमेरिकी कंपनी मायक्रॉन करणार गुजरातमध्ये २.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. मोदी यांचं गृहराज्य गुजरातला अमेरिकेनं मोठी भेट दिली आहे. अमेरिकन कॉम्प्युटर चिप बनवणारी कंपनी मायक्रोननं गुजरातमध्ये २.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी गुजरातमध्ये असेम्बलिंग आणि टेस्टिंग प्लांट उभारणार आहे. कंपनीचे सीईओ संजय मेहरोत्रा यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
PM Modi craze : पंतप्रधान मोदींच्या स्वाक्षरीसाठी अमेरिकी लोकप्रतिनिधींची झुंबड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची जादू अमेरिकेतही पाहायला मिळत आहे. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केल्यानंतर तिथले खासदार पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी उत्सुक होते. त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी खासदारांनी रांगा लावल्या. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फीही काढले. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे अध्यक्ष केविन मॅक्कार्थी यांच्या संबोधन पुस्तिकेवरही स्वाक्षरी केली.
Modi on US Cricket : क्रिकेटचा खेळ अमेरिकेतही लोकप्रिय होतोय - मोदी
यंदाच्या वर्षाअखेरीस भारतात होत असलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या स्पर्धेत पात्र होण्यासाठी अमेरिकेचा संघही प्रयत्न करत आहे. याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या. बेसबॉलवर अमेरिकी जनतेचं प्रेम आहे, मात्र क्रिकेटही आता तिथं लोकप्रिय होत आहे ही चांगली गोष्ट आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Modi Biden meeting : जगापुढील आव्हानांवर पंतप्रधान मोदी आणि जो बायडन यांच्यात चर्चा
पंतप्रधान मोदी आणि जो बायडन यांच्यातील चर्चेचा भर जगाला भेडसावणारी सध्याची आव्हानं यावर होता. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्यावर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली, अशी माहिती परराष्ट्र सचिन विनय क्वात्रा यांनी दिली.
PM Modi in US Congress : पंतप्रधान मोदींनी मानले अमेरिकन लोकप्रतिनिधींचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी यूएस काँग्रेसला संबोधित केलं. हा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यावेळी संसदेत उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचे त्यांनी आभार मानले. हा क्षण भारत-अमेरिकेतील दृढ संबंध आणि चांगल्या भविष्याप्रतीच्या कटिबद्धतेचं प्रतीक आहे, असं ट्वीट मोदींनी केलं आहे.
State Dinner for PM Modi : मोदींसाठी आयोजित स्टेट डिनरमध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती
अमेरिका सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी व्हाइट हाउसमध्ये आयोजित केलेल्या स्टेट डिनरला दोन्ही देशातील दिग्गज उद्योगपतींनी हजेरी लावली. त्यात मुकेश अंबानी, नीता अंबानी, आनंद महिंद्रा यांच्यासह अॅपलचे सीईओ टीम कूक, सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांचाही समावेश होता.
PM Modi in America : अमेरिकी संसदेसमोर पंतप्रधान मोदींचं भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्याचा आज शेवटचा दिवस असून अमेरिकी संसदेसमोर त्यांचं भाषण झालं. आपल्या भाषणातून मोदींनी चीन आणि पाकिस्तानवर जोरादार टीका केली. दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू असून इंडो पॅसिफिकमध्ये कुणाचा आक्रमकपणा खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.