भारतीय लोक हे आळशी आहेत… भारतीयांना कष्ट करण्याची सवय नाही... युरोप, जपान, चीन, रशिया, अमेरिका या देशांइतकी मेहनत आपण भारतीय करत नाही असं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटायचे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी लोकसभेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देत होते.
१९५९ मध्ये देशाला उद्देशून केलेल्या भाषणात नेहरू म्हणाले होते की, ‘समाजाचा विकास कसा होतो? ते मेहनतीच्या जोरावर होतो. मेहनतीतून आपला देश प्रगती करेल आणि संपत्ती निर्माण करेल. तुम्ही जगभरातील समृद्ध देशांकडे पाहा. त्यांनी ते कसे साध्य केले? हे कठोर परिश्रमातून झाले आहे.’ असं मोदी म्हणाले.
‘भारतात लोकांना कष्ट करण्याची सवय नाही. यात आमचा दोष नाही. अशा सवयी परिस्थितीमुळे रुजलेल्या असतात. पण युरोप, जपान, चीन, रशिया आणि अमेरिकेतील लोकांइतके काम आपण करत नाही. ते देश जादूने नव्हे तर कठोर परिश्रमाने समृद्ध झाले असं समजू नका. कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असे नेहरू म्हणाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणादरम्यान माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही निशाणा साधला. ‘इंदिराजींनी नेहरूंपेक्षा वेगळा विचार केला नाही. लाल किल्ल्यावरून भाषण करताना त्या म्हणाल्या होत्या की, जेव्हा एखादे चांगले काम पूर्ण होणार असते, तेव्हा आपण उत्साहाने भारलेलो असतो. परंतु संकटाच्या वेळी आपण आशा गमावून बसतो’, असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
आज कॉंग्रेसच्या लोकांकडे पाहताना असं दिसतं की, इंदिराजी देशातील जनतेचे योग्य मूल्यमापन करू शकल्या नाहीत. पण कॉंग्रेसचं मूल्यमापन अगदी योग्य पद्धतीने केलं, असं मोदी म्हणाले. कॉंग्रेसने देशाच्या क्षमतेवर कधीच विश्वास ठेवला नाही, ही काँग्रेसची मानसिकता आहे. ते स्वत:ला राज्यकर्ते आणि जनतेला कुणी कमी, कुणी लहान समजत होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
संबंधित बातम्या