मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hijab Protest In Iran : इराणमध्ये हिजाबविरोधी महिला आंदोलकांना थेट राष्ट्रपतींची धमकी, म्हणाले...

Hijab Protest In Iran : इराणमध्ये हिजाबविरोधी महिला आंदोलकांना थेट राष्ट्रपतींची धमकी, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 29, 2022 03:00 PM IST

Hijab Protest In Iran : गेल्या अनेक दिवसांपासून हिजाबसक्तीच्या विरोधात इराणमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यानंतर आता राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी आंदोलक महिलांविरोधात कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

Hijab Protest In Iran 2022
Hijab Protest In Iran 2022 (HT)

Hijab Protest In Iran 2022 : इराणमध्ये मेहसा अमिनी या महिलेने हिजाब न घातल्यानं पोलिसांनी तिला अटक केली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत तिचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण इराणमध्ये हिजाबच्या सक्तीविरोधात आंदोलन पेटलेलं आहे. अनेक शहरांमध्ये महिला रस्त्यावर उतरून हिजाब आणि डोक्यावरील केस कापून पेटवत आहे. त्यामुळं आता या आंदोलनामुळं इराण सरकारची डोकेदुखी वाढलेली असतानाच आता इराणी राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी आंदोलकांबाबत मोठं वक्तव्य करत आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांना धमकी दिली आहे.

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी देशातील हिजाबविरोधी आंदोलनाचा निषेध केला असून या आंदोलनात सहभागी होणाऱ्या महिला आंदोलकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय लोकांच्या सुरक्षिततेच्या मुद्दा हा सरकारनं सर्वोच्च स्थानावर ठेवलेला असून कायदा मोडणाऱ्यांना अटक केली जाईल, असं म्हणत त्यांनी आंदोलकांना धमकी दिली आहे.

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनात आतापर्यंत ७६ लोकांचा मृत्यू झालेला असून अनेक शहरांमध्ये अजूनही हे आंदोलन सुरुच आहे. याशिवाय राष्ट्रपती रईसी यांनी मृत मेहसा अमिनीच्या नातेवाईकांशी फोनवर बातचीत केली असून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

दरम्यान इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाचा मुद्दा आता संयुक्त राष्ट्र संघातही गाजत आहे. परंतु यूएनमध्ये पार पडलेल्या एका बैठकीत इराणचे परराष्ट्र मंत्री अमीर अबदुल्लाहियान यांनी या आंदोलनाला गंभीरतेनं घेण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी इराणमध्ये सत्ता उलथवण्यासाठी युरोपीय देश प्रयत्न करत असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर जर्मनी आणि स्पेननं याबाबत इराणच्या राजदूतांना नोटिस पाठवून स्पष्टीकरण मागितलं आहे. तर कॅनडानं इराणमधील हिजाबसक्ती हटवण्याची मागणी केली आहे.

IPL_Entry_Point