राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बंगळुरू स्थित लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांची आज, शुक्रवारी राज्यसभेवर नियुक्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करून ही माहिती दिली. सुधा मूर्ती या या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक, उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या पत्नी असून त्यांनी विविध विषयांवर कन्नड आणि इंग्रजीत ३० पुस्तके लिहिली आहे. सुधा मूर्ती यांनी कर्नाटकात ग्रामविकास तसेच अनाथ बालकांसाठी समाजकार्यात योगदान दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी सुधा मूर्ती यांचे अभिनंदन केले असून विविध क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आणि प्रेरणादायी असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
'राष्ट्रपतींनी @SmtSudhaMurtyJi यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केल्याचा मला आनंद आहे. समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधाजींचे योगदान मोठे आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आपल्या 'नारी शक्ती'चा एक शक्तिशाली पुरावा आहे, जी आपल्या देशाचे भवितव्य घडविण्यात महिलांचे सामर्थ्य आणि क्षमतेचे उदाहरण देते. त्यांना राज्यसभा कार्यकाळ फलदायी व्हावा, यासाठी शुभेच्छा,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सुधा मूर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी कर्नाटकातील हावेरी येथील शिगगाव येथे एका कन्नड भाषिक कुटुंबात झाला. मूर्ती यांच्या वडिलांचे नाव आर.एच. कुलकर्णी होते. कुलकर्णी हे सर्जन होते तर मूर्ती यांची आई विमला कुलकर्णी या शालेय शिक्षिका होत्या. सुधा मूर्ती या ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या माजी अध्यक्षा आहेत. गेट्स फाऊंडेशनच्या पब्लिक हेल्थकेअर इनिशिएटिव्ह्सच्या त्या सदस्य आहेत. मूर्ती यांनी हार्वर्ड विद्यापीठात ‘मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ची स्थापना केली आहे.
सुधा मूर्ती यांना केंद्र सरकारने २००६ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या देशातील तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सुधा मूर्ती यांना अक्षता मूर्ती आणि रोहन मूर्ती ही दोन मुले असून मुलगी अक्षता हिने ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी लग्न केले आहे.
सुधा मूर्ती यांनी कन्नड भाषेत लिहिलेली 'डॉलर बहू' ही कादंबरी लोकप्रिय झाली होती. नंतर या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद झाला होता. २००१ मध्ये ‘झी टीव्ही’ने या कादंबरीवर आधारित हिंदी मालिकेची निर्मिती केली होती. सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या 'ऋण' या कथेवर मराठीमध्ये 'पितृऋण' नावाचा चित्रपट तयार करण्यात आला होता.
संबंधित बातम्या