Ram Mandir: अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील शुक्रवारी (दि १२) निमंत्रण देण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू यांना हे निमंत्रण राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख राम लाल यांनी त्यांच्या निवस्थानी जाऊन दिले आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण पत्र १२ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुपूर्द करण्यात आले, असे विहिंपने म्हटले आहे. यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला आणि अयोध्येला भेट देण्याची वेळ लवकरच ठरवणार असल्याचे सांगितले.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्यासाठी उपाध्यक्ष जगदीप धनखड यांना आलोक कुमार आणि नृपेंद्र मिश्रा यांनी निमंत्रण दिले. यावेळी धनखड म्हणाले, "मी माझ्या तीन पिढ्यांसह अयोध्या धामला नक्की येईन. निमंत्रण मिळाल्याने मी भारावून गेलो आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्या हस्ते हे निमंत्रण देण्यात आले. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशभरातील हजारो संतांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अगोदर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) चे स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते देशभरातील लोकांपर्यंत पोहोचत आहेत. विविध शहरातील मंदिरांमध्ये प्रार्थना करून त्यांना अभिषेक सोहळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले असून या सोहळ्यासाठी ते अयोध्येला जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रित दिले आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि केंद्रातील सत्ताधारी एनडीए आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या