Ayodhya Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा संपली आहे. अवघ्या काही वेळात हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी आयोध्यानगरी ही एका नववधूप्रमाणे सजली आहे. या बहुप्रतिक्षित धार्मिक विधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित राहणार आहेत. रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्याच दिवशी हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. आज दुपारी १२.२० वाजता 'प्राण प्रतिष्ठा' सोहळा सुरू होईल आणि दुपारी १ वाजेपर्यंत हा सोहळा पूर्ण होईल. यानंतर पंतप्रधान कार्यक्रमस्थळी संत आणि प्रतिष्ठित व्यक्तींसह ७००० हून अधिक लोकांच्या मेळाव्याला संबोधित करतील.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, रविवारी विविध तीर्थक्षेत्रांवरून आणलेल्या ‘औषधी’ आणि पवित्र पाण्याने भरलेल्या ११४ घाडय़ांनी राम लालांच्या मूर्तीला स्नान घालण्यात आले. ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले की, "मूर्ती आज मध्याधिवासात ठेवण्यात आली होती. रविवारी 'रात्री जागरण अधिवास' सुरू करण्यात आला आहे. रामलल्लाच्या जुन्या मूर्तीची 'यज्ञशाळेत' पूजा केली जात आहे. चेन्नई आणि पुण्यासह अनेक ठिकाणी धार्मिक विधी सुरू आहेत. भारतातून आणलेल्या फुलांनी हे शहर सजवण्यात आले आहे. मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि त्यांचे कुटुंबीय, विहिंप प्रमुख आर.एन. सिंह आणि इतर धार्मिक विधी करत आहेत.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला १६ जानेवारी पासून सुरुवात झाली होती. या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले काही लोक रविवारी अयोध्येत पोहोचले. आज देखील मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्या नगरीत येत आहेत. सोमवारी सकाळी लाखो लोक हा कार्यक्रम टीव्ही आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पाहतील. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. प्रभू राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रविवारी सोहळा, त्यासोबतच देश-विदेशातही यानिमित्त विशेष उत्सव जाहीर करण्यात आला आहे.
वॉशिंग्टन डीसीपासून पॅरिस आणि सिडनीपर्यंत जगातील विविध भागांमध्ये आज या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे. अयोध्यानगरी फुलांनी आणि दिव्यांनी सजली असून रविवारी ठिकठिकाणी लावलेल्या लाऊडस्पीकरवर 'राम धुन' वाजवण्यात येत आहे. प्रभू राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या वेषात शहरवासी रस्त्यावर आले असून त्यांच्या पाठोपाठ मंत्रमुग्ध भाविकही रॅलीत सामील झाले होते .
म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामललाच्या नवीन ५१ इंची मूर्तीची गुरुवारी दुपारी मंदिराच्या गर्भगृहात स्थापना करण्यात आली. 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यासाठी भारताच्या विविध भागातून १४ जोडपी 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यासाठी 'यजमान' म्हणून आमंत्रित करण्यात आले आहेत. मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, मंदिरात प्रवेश पूर्व दिशेकडून आणि दक्षिणेकडून मंदिरातून बाहेर पडता येणार आहे.
हे मंदिरत तीन मजली असून मुख्य मंदिरात जाण्यासाठी भाविकांना पूर्वेकडून ३२ पायऱ्या चढाव्या लागतील. पारंपारिक नगर शैलीत बांधलेले मंदिर परिसर ३८० फूट लांब (पूर्व-पश्चिम दिशा), २५० फूट रुंद आणि १६१ फूट उंच असेल. मंदिराचा प्रत्येक मजला २० फूट उंच असेल आणि त्याला एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील.
या सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मंदिर नगरातील प्रत्येक मुख्य चौकात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भूकंप आणि पूर तसेच रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक हल्ले यासारख्या घटनांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पथकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. थंडीचा प्रादुर्भाव पाहता कोणत्याही आरोग्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनानेही तयारी केली आहे. अयोध्या आणि जिल्हा रुग्णालये आणि येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) च्या तज्ञांनी आरोग्य सेवा संस्थांमधील डॉक्टरांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित केले आहे.
भव्य राम मंदिर फुलांनी आणि विशेष रोषणाईने सजले आहेत. आणि संपूर्ण शहर धार्मिक रंगात रंगले आहे. संपूर्ण शहर हे राममय झाले आहे. लता मंगेशकर चौक येथे ठिकठिकाणी रामलीला, भागवत कथा, भजन संध्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सरयू नदीचे पात्रही सजले आहे. तिथे दररोज संध्याकाळी आरतीसाठी हजारो लोकांची गर्दी होत आहे. देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका., विमा कंपन्या, वित्तीय संस्था आणि प्रादेशिक ग्रामीण बँका २२ जानेवारीला अर्धा दिवस बंद राहतील.
एनएसई आणि बीएसई स्टॉक एक्स्चेंजनेही या दिवशी ट्रेडिंग न करण्याची घोषणा केली आहे. अयोध्येतील 'प्राण प्रतिष्ठा'च्या आधी सुमारे दोन तास ऐकू येणाऱ्या दिव्य 'मंगल ध्वनी'मध्ये देशभरातील ५० पारंपरिक वाद्ये वापरली जाणार आहेत. अयोध्येतील प्रसिद्ध कवी यतींद्र मिश्रा यांनी आयोजित केलेल्या या भव्य संगीत सादरीकरणाला नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे सहकार्य लाभले आहे. 'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र' नुसार सकाळी १० वाजता हे संगीत सादरीकरण सुरू होईल.
या कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील बासरी व ढोलक, कर्नाटकातील वीणा, महाराष्ट्रातील सुंदरी, पंजाबमधील अलगोजा, ओडिशातील मर्दाला. महला, मध्य प्रदेशातील संतूर, मणिपूरमधील पुंग, आसाममधील नगारा आणि काली, छत्तीसगडमधील तंबुरा, बिहारमधील पखाकज, दिल्लीतील शहनाई आणि राजस्थानमधील रावणहल्य या कलाकारांचा समावेश असेल.
पश्चिम बंगालचे श्रीखोल आणि सरोद, आंध्र प्रदेशचे घटम, झारखंडचे सितार, तामिळनाडूचे नादस्वरम आणि मृदंग आणि उत्तराखंडचे हुडा कलाकरही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या सोहळ्यासाठी ७,००० हून अधिक लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. राज्य पाहुण्यांच्या यादीत प्रमुख राजकीय नेते, मोठे उद्योगपती, चित्रपट अभिनेते, खेळाडू, नोकरशहा आणि मुत्सद्दी यांचा समावेश आहे. 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये रामजन्मभूमीतील मंदिरासाठी आंदोलन करणाऱ्यांचाही समावेश आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी आणि प्रसिद्ध खेळाडू सचिन तेंडुलकर यांचाही आमंत्रित पाहुण्यांच्या यादीत समावेश आहे. या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या जवळपास सर्वच विरोधी पक्षनेत्यांनी समारंभाला येण्यास नकार दिला आहे. काँग्रेसने याला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम म्हटले आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांचा या यादीत समावेश नाही पण ते कडाक्याच्या थंडीत चालत, सायकलिंग आणि स्केटिंग करून अनोख्या पद्धतीने अयोध्येत पोहोचत आहेत.
या भव्यदिव्य सोहळ्यासाठी देशाच्या विविध भागातून भेटवस्तू पाठविण्यात येत असून त्यात प्रभू रामाचे चित्र असलेल्या बांगड्या, ५६ प्रकारचे पेठे, ५०० किलो लोखंडी-पितळेचा 'नगाडा' आणि अमरावतीहून येणारी ५०० किलोचे "कुंकू' यांचा समावेश आहे. राम मंदिर व्यवस्थापन समितीला १०८ फूट अगरबत्ती, २१०० किलो वजनाची घंटा, सोन्याची चप्पल, १० फूट उंच कुलूप आणि चावी आणि आठव्या शतकातील घड्याळ यासह अनेक भेटवस्तू मिळाल्या आहेत. नेपाळमधील सीतेचे जन्मस्थान जनकपूर येथूनही ३ हजार हून अधिक भेटवस्तू आल्या आहेत. श्रीलंकेतील एका शिष्टमंडळाने रामायणातील अशोक वाटिकेची खास भेट आणली आहे. भाविकांच्या भोजनासाठी भंडारा, लंगर आदी विविध सामुदायिक स्वयंपाकगृहे येथे चालवली जात आहेत. ही सामुदायिक स्वयंपाकघरे निहंग शिखांपासून ते इस्कॉन आणि देशभरातील मंदिर ट्रस्ट ते अयोध्येतील स्थानिक लोकांद्वारे चालवली जात आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी आपला निकाल देताना वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्याचे आणि अयोध्येतील महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जमीन मुस्लिमांना देण्याचे आदेश दिले होते. डिसेंबर १९१९२ मध्ये कारसेवकांनी वादग्रस्त जागेवर असलेली बाबरी मशीद पाडली होती.
संबंधित बातम्या