Pregnancy Test: प्रत्येक क्षेत्रात महिला आज आघाडीवर आहेत. आजच्या काळात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. मात्र, तरीही मुलींच्या तुलनेत मुलांना अधिक महत्त्व दिले जाते. भारतात गर्भलिंग निदान चाचणी हा मोठा गुन्हा आहे, याची चांगली जाणीव असताना नागरिक गर्भातील लिंग जाणून घेण्यासाठी आता नेपाळला जात असल्याची माहिती समोर आली. भारतीयांसाठी नेपाळ हे गर्भलिंग निदान चाचणी केंद्र बनल्याचे एका समाजिक कार्यकर्त्याने आरोप केला आहे.
उत्तराखंडमधील पिथौरागढ तसेच इतर जिल्ह्यातील अनेक लोक गर्भातील लिंग जाणून घेण्यासाठी दररोज नेपाळच्या विविध शहरांमध्ये पोहोचत आहेत. केवळ १० हजार रुपयांमध्ये गर्भवती महिलांचे लिंग निर्धारण केले जात आहे. यामध्ये अशा महिलांचा समावेश आहे, ज्यांना आधीच दोन किंवा अधिक मुली आहेत.
सीमाभागातील लोकांसाठी सर्वात जवळचे शहर बैताडी आहे, जे लाघाटपासून फक्त २२ किमी अंतरावर आहे. त्यामुळे येथेच बहुतांश लोक गरोदर महिलांची तपासणी करून घेत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच एक व्यक्ती त्याच्या गर्भवती पत्नीसह गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी नेपाळमधील बैतारी येथे आला होता.
नेपाळमध्ये कोणत्याही कागदपत्राशिवाय ही चाचणी केली जाते.भारतात प्रशासनाने अल्ट्रासाऊंडसाठी आधार कार्ड अनिवार्य केले असले तरी नेपाळमध्ये तशी तरतूद नाही. याचा अर्थ असा आहे की कोणत्याही कागदपत्राशिवाय कोणीही रुग्णालयात जाऊन गर्भलिंग निदान चाचणी करू शकतो.
पिथौरागढच्या गर्ल्स होम कार्ड संस्थेच्या अधीक्षक हेमा कापरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैताडी व्यतिरिक्त नेपाळमधील अनेक शहरांमध्ये लिंग चाचणी केली जाते. सीमावर्ती भागातील लोकही लिंग चाचणीसाठी नेपाळला जात आहेत. लोकांना असे न करण्याचे आवाहन केले जात आहे. तर, नेपाळ येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन सिंह म्हणाले की, "भारतातून गेल्या काही काळापासून अनेक लोक आरोग्य तपासणी करण्याच्या बहाण्याने नेपाळमध्ये येत आहेत. पंरतु, येथे ते गर्भलिंग निदान चाचणी करून घेत आहेत."