मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Prajwal Samrit : आयआयएमची ऑफर नाकारत मिलिटरी अकादमीत घेतला प्रवेश, कारगिल युद्धात शहीद जवानाच्या मुलाचा धाडसी निर्णय

Prajwal Samrit : आयआयएमची ऑफर नाकारत मिलिटरी अकादमीत घेतला प्रवेश, कारगिल युद्धात शहीद जवानाच्या मुलाचा धाडसी निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 23, 2023 11:14 AM IST

Viral News Marathi : कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानाच्या मुलाने कॅटच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळं त्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

Prajwal Samrit Wardha
Prajwal Samrit Wardha (HT)

Prajwal Samrit Wardha : पाकिस्तानशी १९९९ साली झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानाच्या मुलाने अत्यंत धाडसी निर्णय घेत देशातील तरुणांसाठी मोठी आदर्श निर्माण केला आहे. कारगिल युद्धात शहीद झालेले मराठमोळे लान्स नायक कृष्णाजी समरीत यांचा मुलगा प्रज्वल समृत याने डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मध्ये सामील होऊन आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रज्वलने कॅट परिक्षेत ९७ टक्के गुण प्राप्त करत मोठं यश मिळवलं होतं. त्याला आयआयएम इंदूर आणि आयआयएम कोझिकोड या संस्थांच्या मोठ्या ऑफर्स नाकारत भारतीय सैन्यात सेवा बजावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता त्याचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक करत अभिनंदन केलं आहे.

प्रज्वल समृत हा महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या पुलगावचा रहिवासी आहे. कारगिल युद्धात वडिल शहीद झाल्यानंतर कुटुबांची सर्व जबाबदारी आई सरीता आणि भाऊ कुणाल यांच्यावर आली. परंतु अशा स्थितीत प्रज्वलने एमटेक पूर्ण केल्यानंतर एमबीएससाठी कॅटची परिक्षा देत घवघवीत यश संपादन केलं आहे. त्याला देशातील दोन मोठ्या आयआयएम संस्थांची मोठी ऑफर होती. परंतु त्याने आयआयएमच्या ऑफर्स नाकारत भारतीय सैन्यात करिअर निवडलं आहे. प्रज्वलने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बीएस्सी इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी पूर्ण केली आहे. याशिवाय तो भारतीय सैन्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय परीक्षेतही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे.

प्रज्वलला डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश मिळाला आहे. येत्या जूलै महिन्यापासून त्याचा १८ महिन्यांचा खडतर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रज्वल हा भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर रुजू होणार आहे. कारगिल युद्धात वडील शहीद झाल्यानंतर ४५ दिवसांनी प्रज्वलचा जन्म झाला होता. त्याच्या आईने प्रज्वलला सैन्यात पाठवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यामुळं आता प्रज्वलच्या निर्णयाने आई सरिता यांना मोठा आनंद झाला आहे.

IPL_Entry_Point